नागपूर : रेल्वे बोर्डाच्या निर्णयानुसार, नागपूर रेल्वेस्थानकावर गुरुवारी १०० फूट उंचीचा तिरंगा झेंडा उभारण्यात आला. आता लवकरच या झेंड्याचे लोकार्पण होणार आहे.
रेल्वे स्थानकावर सतत लोकांची वर्दळ असते. त्यामुळे लोकांच्या डोळ्यांपुढे राष्ट्रध्वज दिसत राहिला, तर त्याचा सकारात्मक परिणाम होईल आणि नागरिकांच्या मनामधील राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत होईल, या भावनेने देशातील ए प्लस श्रेणीच्या रेल्वे स्थानकांच्या पुढील भागात १०० फूट उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला होता व तसे आदेश रेल्वेच्या सर्व झोनना दिले होते. यासाठी २६ जानेवारी ही मुदत ठरविण्यात आली होती. मध्यरेल्वेतील भुसावळ रेल्वेस्थानकावर आणि पश्चिम रेल्वेच्या ९ स्थानकांवर २४ जानेवारीपूर्वीच राष्ट्रीय ध्वज उभारण्यात आला. नागपुरात आता ही तयारी पूर्ण झाली आहे.
गुरुवारी नागपूर रेल्वेस्थानकावर पश्चिमेस आरक्षित तिकीट केंद्राच्या दर्शनी हिरवळीवर या राष्ट्रध्वजाची उभारणी करण्यात आली. त्याची चाचणी घेण्यात आली. लवकरच राष्ट्रध्वजाच्या पायथ्याशी चबुतरा व सौंदर्यीकरण करण्यात येईल. रात्रीच्यावेळी या ध्वजावर प्रकाशझोत सोडला जाईल. त्यामुळे ते आगळे आकर्षण ठरेल. राष्ट्रध्वजाजवळच सेल्फी पाॉइंट ठेवण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना येथे सेल्फी घेता येईल.
नागपुरी अधिकाऱ्याची कल्पना
रेल्वे स्थानकापुढे राष्ट्रध्वज उभारला तर त्यामुळे लोकांच्या मनातील राष्ट्रप्रेम अधिक वृद्धिंगत होईल, ही संकल्पना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतिजा यांची होती. सतिजा यांनीच ही कल्पना रेल्वे बोर्डाकडे मांडली होती. बोर्डानेही ही कल्पना उचलून धरली आणि या कल्पनेवरून आदेश काढला, हे विशेष.
अधिक वाचा : ‘मेअर इनोव्हेशन अवॉर्ड’चे वितरण २ मार्चला