शिंदे-फडणवीस दिल्ली दौर्‍यावर; मंत्र्यांची यादी होणार निश्चित

Date:

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्यापही अनिश्चितताच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी पुन्हा दिल्लीला जाणार असल्याचे कळते. येत्या दोन-तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तारावर अंतिम निर्णय होण्याचे संकेत मिळत आहेत. शनिवारी आणि रविवारी दोघेही दिल्लीत असणार आहेत. या भेटीत मंत्र्यांची यादी निश्चित केली जाण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी दिल्लीत होते. त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मंत्रिमंडळ विस्तारासबंधी चर्चा केल्याचे समजते. भाजपच्या मंत्र्यांची यादी जवळपास निश्चित झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या सुचविलेल्या यादीत मागील सरकारमध्ये मंत्री असलेल्या दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, बच्चू कडू, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा समावेश आहे. त्याशिवाय सहा ते सात नव्या चेहर्‍यांचाही समावेश आहे. मात्र विस्तार करताना तो दोन टप्प्यांत करण्यात येणार असल्याने सर्वांचा आत्ताच समावेश होणार नाही. पहिल्या टप्प्यात नंबर लागावा म्हणून शिंदे गटात चुरस आहे. तसेच अन्य आमदारांचाही मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर दबाव आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सोडता मंत्रिमंडळात 40 जागा रिक्त आहेत. त्यापैकी 12 ते 15 जागा रिक्त ठेवून पहिल्या टप्प्यातील विस्तार केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता फडणवीस हे शनिवारी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलविलेल्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहेत. तर निती आयोगाच्या रविवारी होणार्‍या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत असणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत व्यक्त करण्यात आलेले सर्व अंदाज चुकले असून या दौर्‍यात मंत्रिमंडळ विस्तारावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पुढच्या आठवड्यात मंगळवारी किंवा बुधवारी शपथविधी होऊ शकतो.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related