नागपूर: नागपूरच्या मिहान विशेष औद्योगिक क्षेत्रामध्ये (सेझ) टाल या ऐव्हिऐशन कंपनीने उत्पादन चालू केले असून बोईंग या एयरक्राफ्ट निर्मिती करणा-या कंपनीला 25,000 फ्लोर बीमचा पुरवठा करून या कंपनीने एक विक्रम स्थापित केला आहे. नागपूरचे एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग हबचे स्वप्न यामुळे आधिक बळकट होईल, असा आशावाद केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी याप्रसंगी व्यक्त केला. ‘टाल’ या टाटा उद्योग समूहाच्या एयरोस्पेस व संरक्षण क्षेत्रातील कंपनीतर्फे त्यांच्या मिहान येथील प्रकल्पातून 25 हजार ऍडव्हान्स कंपोझिट फ्लोर बीम (ए.सी.एफ.बी.) या एयरक्राफ्ट निर्मिती साठी लागणा-या पार्टची रवानगी बोंईग एयरक्राफ्ट कंपनीला आज करण्यात आली, यावेळी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. टाल कंपनीचे अध्यक्ष विजय सिंग, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वन राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, महापौर नंदा जिचकार, बोईंग इंडियाचे अध्यक्ष सलिल गुप्ते या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
टाल कंपनीसाठी मिहानमध्ये जागा संपादन करण्यास शासनाने पुढाकार घेतला व टाटा समुहाने त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आपला प्रकल्प मिहानमध्ये चालू केला. या प्रकल्पात स्थानिक युवक काम करत आहेत, ही बाब अभिमानास्पद असल्याचे सांगून गडकरी यांनी टाल कंपनीला मिहानमध्ये विस्तार करण्याचे सुचविले.आय.आय.आय.टी, आय.आय.एम,
राज्य सरकारने मिहानमधील कंपन्याना कमी दरात वीज उपलब्ध करून दिली असल्याने मिहानमध्ये औद्योगिक प्रकल्पांना चालना मिळत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या कार्यक्रमादरम्यान बोईंग इंडियाचे अध्यक्ष सलील गुप्ते व टाल कंपनीचे संचालन विभागाचे अध्यक्ष यांच्यात ए.सी.एफ.बी. पार्टच्या रवानगी बाबतच्या कागद पत्रांचे हस्तांरणही झाले.
बोईंग इंडियाचे अध्यक्ष सलील गुप्ते यांनी बोईंग व टाल यांची भागीदारी ही भारताच्या स्किल इंडिया व मेक इन इंडिया अभियानात महत्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी बोईंग इंडियाचे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.