झिरो माइल नागपूर मॅराथॉन १८ नोव्हेंबरला

झिरो माइल नागपूर मॅराथॉन

नागपूर : गेल्या दोन वर्षांपासून शहरातील धावपटूंसाठी आयोजित होणाऱ्या झिरो माइल नागपूर मॅराथॉनच्या यंदाच्या तिसऱ्या आवृत्तीत २ हजारहून अधिक धावपटू सहभागी होणार असल्याची माहिती आहे. १८ नोव्हेंबरला, रविवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडांगणावरून या मॅराथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदा मॅराथॉनचे तिसरे वर्ष असून यात १० किलोमीटर महिलांसाठी सायकल रेसही ठेवण्यात आली आहे.

या मॅराथॉनबद्दल अधिक माहिती देतांना झिरो माइल नागपूर मॅराथॉनचे मुख्य संयोजक निशिकांत काशीकर म्हणाले, यंदा मॅराथॉनचे तिसरे वर्ष असून तिसऱ्या वर्षी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत एचसीएल समूह मॅराथॉनशी जुळला आहे. गेल्या तीन वर्षात झिरो माइल मॅराथॉनने एक वेगळी ओळख निर्माण केली असून सहभागी होणाऱ्या धावपटूंची संख्याही वाढली आहे. यंदा २ हजार धावपटू अपेक्षित असून नोंदणीच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे १७ नोव्हेंबरपर्यंत यात वाढ होण्याची शक्यताही काशीकर यांनी व्यक्त केली. १६ वर्ष व त्याहून अधिक वयोगटासाठी २१.१ किलोमीटरची हाफ मॅराथॉन मुख्य आकर्षण असणार आहे. ही दौड पूर्ण करण्यासाठी ८५ मिनिटांमध्ये पूर्ण करणे अनिवार्य असून असे करणाऱ्यांना १० हजार रुपयांचे प्रथम, ७ हजार ५०० रुपयांचे द्वितीय आणि ५ हजार रुपयांचे रोख तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात येईल. मात्र, नियोजित वेळेत पूर्ण न करणाऱ्या व प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या धावपटूंना १ हजार रुपये रोख पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.

विविध वयोगटासाठी मॅराथॉन पूर्ण करण्याच्या वेगवेगळ्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या वेळा आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळांनुसारच आहेत. तसेच नागपूर जिल्हा अॅथलेटिक्स संघटना मॅराथॉनची सर्व तांत्रिक बाजू सांभाळणार असल्याचेही काशीकर यांनी स्पष्ट केले. या मॅराथॉनमध्ये उत्कृष्ट टायमिंग नोंदवणारे धावपटू मुंबईच्या टाटा मॅराथॉन व देशभरातील इतर मोठ्या व नावाजलेल्या मॅराथॉनसाठी पात्र ठरू शकतील अशी माहिती सहसंयोजक शाहिना ललानी यांनी स्पष्ट केले. दक्षिण आफ्रिकेतील कॉमरेडस मॅराथॉन पूर्ण करणारे वैभव अंधारे स्पर्धेचे ब्रॅन्ड अॅम्बेसेडर असतील.

हाफ मॅराथॉनबरोबरच १०.५ किलोमीटरची एन्ड्युरन्स रन, ५ किलोमीटरची ड्रीम रन आणि ३ किलोमीटरची रन/वॉक १० वर्ष व त्याहून अधिक वयोगटासाठी असेल. मॅराथॉनला सकाळी ५.४५ वाजता नागपूर विद्यापीठाच्या क्रीडांगणावरून सुरुवात होईल व त्याचठिकाणी त्याचा समारोप होईल. या शिवाय यादरम्यान केवळ महिलांसाठी ऑल वुमन्स लेडी बर्ड सायक्लाथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १० किलोमीटरची असेल. यात २०० महिला सायकलपटू सहभागी होण्याची अपेक्षा आहे. तसेच ज्या महिलांकडे सायकल नसेल त्यांना आयोजकांकडून सायकल देण्यात येईल, असे या स्पर्धेच्या आयोजक कंचन चौधरी यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला वैभव अंधारे, डॉ. अमित समर्थ, ऑरेंज सिटी रनर्स सोसायटीचे प्रशांत गुजर आदी उपस्थित होते.

अधिक वाचा : IFCCI Indo-French Investment Conclave in Nagpur on Nov 2

Comments

comments