उत्तर प्रदेशातील एका आरोग्य केंद्रावर नर्सने फोनवर बोलत बोलत एका महिलेला दोनदा लस दिल्याचे प्रकरण ताजे असतानाच महाराजगंज येथे एका व्यक्तीला पहिली लस कोव्हॅक्सिनची (Covaxin) आणि दुसरी लस कोव्हिशिल्डची (Covishield) देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकाराने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. ही बाब संबंधित नागरिकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने लसीकरण केंद्रावर एकच गोंधळ घातला.
गौरव सिंह नावाची व्यक्ती सोगवारमध्ये चालक म्हणून काम करते. त्याच्या म्हणण्यानुसार, २५ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यावेळी त्यांना ‘कोव्हॅक्सिन’ ही लस देण्यात आली होती. लसीचा दुसरा डोस त्यांना २५ मार्च रोजी देण्यात येणार होता. परंतु, या दिवशी काही कारणामुळे त्यांनी लस घेतली नाही.
मंगळवारी १३ एप्रिल रोजी ते दुसरा डोस घेण्यासाठी जिल्हा मुख्यालयातील लसीकरण केंद्रावर पोहचले. इथे त्यांना लस देण्यात आली. परंतु, तेथील कर्मचाऱ्याने ‘कोव्हॅक्सिन’ऐवजी ‘कोव्हिशिल्ड’ चा डोस दिला. त्यानंतर त्यांनी रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल केली. डोसची आदलाबदल झाल्याचे लक्षात आल्यानंतर गौरव सिंह यांना मोठा धक्का बसला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर डेप्युटी सीएमओ आय. ए. अन्सारी लसीकरण केंद्रावर दाखल झाले. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहेत.
संबधित व्यक्तीला काहीही होणार नाही, असे सांगून अन्सारी यांनी आश्वस्त केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना थोडा ताप आला होता परंतु, औषध घेतल्यानंतर आता ते बरे आहेत. परंतु असं होणं हे चुकीचंच असल्याचेही ते म्हणाले.