पटणा : तुम्ही जास्तीत जास्त किती महागडी भाजी पाहिली असेल?, हा प्रश्न तुम्हाला कोड्यात टाकणारा वाटू शकतो. कारण बाजारात भाज्यांचे भाव थोडेजरी वाढले, तरी आपण ओरडतो. कारण आपल्याकडे असलेल्या भाज्यांचा दर फार तर फार 100 रुपये किलोच्या आसपास असतो. मात्र, अशी एक भाजी आहे जिचा दर तब्बल 1 लाख रुपये किलो आहे.
या भाजीचं नाव आहे हॉप-शूट्स (hop-shoots). या भाजीचा उपयोग यापूर्वी औषध तयार करण्यासाठी व्हायचा. मात्र आता हॉप-शूट्सचा वापर भाजी म्हणूनसुद्धा होतो आहे. असं म्हटलं जातं की, या भाजीचा उपयोग शरीरातील कॅन्सरस सेल्स मारण्यासाठी होतो. त्यासाठी ही भाजी चांगल्या प्रकारे काम करते. हॉप-शूट्सच्या याच गुणधर्मामुळे ही भाजी जगातील सर्वात महागडी असून त्याची किंमत तब्बल 1 लाख रुपये किलोच्या आसपास आहे.
बिहारच्या औरंगाबादेत होतेय शेती
बरं हॉप-शूट्स या भाजीची चर्चा नेमकी आताच का होतेय हा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर, हॉप-शूट्स चर्चेत येण्याचं कारण म्हणजे जगातील सर्वात महागडी भाजी चक्क भारतात पिकवली जातेय. बिहार राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील अमरेश सिंह नावाचा शेतकरी या भाजीची शेती करतोय. मिळालेल्या माहितीनुसार हॉप शूट्स या भाजीच्या फुलाला ‘हॉप कोन्स’ म्हणतात. या फुलाचा उपयोग बियर तयार करण्यासाठी केला जातो. तर या हॉप-शूट्सच्या फांद्यांचा उपयोग भाजी तयार करण्यासाठी केला जातो.
थेट आएएस अधिकाऱ्याने घेतली दखल
दरम्यान, शेतकऱ्याच्या या शेतीची दखल थेट आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी घेतली आहे. याच कारणामुळे हॉप-शूट्सच्या शेतीची चर्चा संपूर्ण भारतभर होतेय. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार हॉप-शूट्स ही जगातील सर्वात महागडी भाजी असून औरंगाबाद जिल्ह्यातील अमेरश सिंह हे या भाजीची शेती करतात. अशा प्रकारची शेती करणारे भारतातील ते पहिलेच शेतकरी आहेत. सुप्रिया साहू यांनी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारची शेती ही भारतीय शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर ठरू शकते.



