नागपूर : ‘सत्तेसाठी प्रत्येकाचे वेगवेगळे खेळ सुरू आहेत. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचेही वेगळे खेळ सुरू आहेत. पंतप्रधानांच्या हत्येच्या कटात माझे नाव गोवण्यात आले. तीन महिने थांबा, पुढील निवडणुकीत भाजपला चारवर आणल्याशिवाय राहाणार नाही’, असे सांगतानाच सरसंघचालक मोहन भागवत यांना नागपूरच्या तुरुंगात टाकण्याचा जाहीर इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर येथील जाहीर सभेत दिला.
नागपूर येथे गुरुवारी एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघातर्फे वंचित बहुजन आघाडीचे ‘अर्थव्यवस्था अधिवेशन’ घेण्यात आले. यावेळी आंबेडकर यांनी सरकारवर सडकून टीका केली. उर्जित पटेल यांच्या जागी आलेले आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास हे इतिहासाचे पदवीधर आहेत. अर्थशास्रातील तज्ज्ञाऐवजी इतिहासातील पदवीधर आणून यांना रिझर्व्ह बँक इतिहासजमा करायची आहे काय, असा सवाल आंबेडकर यांनी केला.
प्रकाश आंबेडकर चालतील, पण ओवेसी नाही
राज्यात काँग्रेसही खेळ खेळत आहे. प्रकाश आंबेडकर चालतील. पण, ओवेसी चालणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जाहीररित्या सांगितले आहे. पण ओवेसींना सोडून काँग्रेससोबत कदापि युती होणार नाही, असे आंबेडकर यांनी ठणकावून सांगितले. काँग्रेसला आंबेडकर चालतात. मग ओवेसी का चालत नाही, असा सवाल आंबेडकर यांनी केला.
मुळात अशोक चव्हाण यांना आमच्याशी बोलण्याचे अधिकार केंद्रीय नेतृत्वाने दिले आहेत काय, असा सवालही त्यांनी केला. आतापर्यत पाच बैठका झाल्या. पण अजूनही केंद्रीय नेतृत्वाकडून चर्चेचा निरोप आला नाही, असे आंबेडकर म्हणाले. सभेचे प्रमुख आकर्षण असलेले असदुद्दीन ओवेसी न आल्यामुळे उपस्थितांची निराशा झाली.
अधिक वाचा : अवनी प्रकरण: मुनगंटीवारांनी ठोकला संजय निरुपमांवर अब्रुनुकसानीचा दावा