नागपुर : यवतमाळ जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या टी-1 या नरभक्षी वाघिणीला ठार करण्यात यावे, असे निर्देश सर्वोच्च न्यालयाने दिले आहे. त्या विरूद्ध, त्या वाघिणीला ठार मारण्याऐवजी बेशुद्ध करून पकडण्यात यावे. अशी मागणी करत वन्यजीव प्रेमींनी आज नागपुरात मोर्चा काढत आंदोलन केले. हे मोर्चा आंदोलन महाराजबाग येथून शुरू करुण संविधान चौक येथे संपविण्यात आले.
यवतमाळच्या राळेगावातल्या जंगलातील टी-1 या नरभक्षक वाघिणीने आतापर्यंत पांढरकवडा येथील १२ लोकांना भक्ष्य केले होते. या प्रकरणी त्या वाघिणीला आधी बेशुद्द करून पकडण्याचा प्रयत्न करावा किंवा ते शक्य न झाल्यास तिला ठार करण्यात यावे असे निर्देश सर्वोच्च न्यालयाने दिले होते. या आदेशाने वन्यजीव प्रेमी मात्र नाराज झाले आहेत.
या वाघिणीला पकडण्यासंदर्भात किंवा ठार मारण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे वन विभागाचे काही अधिकारी उल्लंघन करत असल्याचा आरोप करत वन्यजीव प्रेमींनी आज शहरात मोर्चा काढला. शहरातील महाराजबाग येथून सुरु झालेला हा मोर्चा संविधान चौक येथे संपला. या मोर्चात विदर्भातील अनेक जिल्ह्यातून वन्यजीव प्रेमी सहभागी झाले होते.
या नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचे आदेश मिळताच शार्प शुटर राळेगावच्या जंगलात दाखल झाले आहेत. मात्र, वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करावे अशी वन्यजीवप्रेमींची मागणी आहे. तसेच, वन विभागाचे काही अधिकारी वाघिणीला पकडण्याचे प्रयत्न न करता तिला फक्त मारण्याच्या मागे असल्याचे आरोप वन्यजीव प्रेमींनी केला आहे.
शिवाय शफाअत अली खान नवाब या खाजगी शिकाऱ्याला बोलावून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व नियम-कायदे पायदळी तुडवून वाघिणीला मारण्याचे प्रयत्न सुरु केल्याचेही आरोप वन्यजीव प्रेमींनी केले आहे. त्यामुळे या नंतरही जर वन अधिकाऱ्यांनी वाघीणीला बेशुद्ध करण्याचे प्रयत्न केले नाहीत, तर पुन्हा न्यायालयात दाद मागू, असे देखील वन्यजीव प्रेमींनी स्पष्ट केले आहे.
अधिक वाचा : ‘त्या’ वाघिणीला शक्यतोवर जिवंत पकडण्याचे प्रयत्न सुरु