नागपूर : संतप्त पतीने पत्नी व मुलाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करून मृतदेह शेतात पुरल्याची खळबळजनक घटना अरोली पोलिस स्टेशनअंतर्गत खात येथे मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी हत्या व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्याला अटक केली आहे. अनिरुद्ध सुखदेव बावणे ( वय ४७, रा. खात), असे मारेकऱ्याचे, तर लता बावणे (वय ३५) व धीरज (वय १८, दोन्हा रा. हुडकेश्वर),अशी मृतकांची नावे आहेत.
अनिरुद्ध हा दुसरी पत्नी प्रभा व मुलीसह खात येथे राहातो. त्याची पहिली पत्नी लता ही मुलगा धीरज याच्यासह हुडकेश्वरमध्ये राहात होती. लता यांना पैशाची आवश्यकता होती. २६ नोव्हेंबरला त्या मुलाला घेऊन खात येथे गेल्या. यावेळी अनिरुद्ध हा शेतात होता. दोघे शेतात गेले. लता यांनी अनिरुद्धला पैशाची मागणी केली. दोघांमध्ये वाद झाला. संतप्त होऊन अनिरुद्धने लता यांच्या डोक्यावर दगडाने वार केला. रक्ताच्या थारोळ्यात लता खाली पडल्या. धीरज हा लता यांना वाचिवण्यासाठी धावला असता अनिरुद्धने धीरजच्याही डोक्यावर दगडाने वार केले. घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाला. अनिरुद्धने दोघांचे मृतदेह शेतात लपविले. घरी गेला. आंघोळ केली. मध्यरात्री मीठ व कुदळ घेऊन तो शेतात आला. खड्डा खोदला. दोघांचे मृतदेह पुरले. २ नोव्हेंबरला लता यांचे भाऊ नारायण लक्ष्मण डहाके (रा. काटोल) यांनी लता व धीरजच्या मोबाइलवर संपर्क साधला. संपर्क झाला नाही. त्यांनी लता यांच्या घरमालकाकडे विचारणा केली. दोघे खात येथे गेल्याचे नारायण यांना कळले. ते खात येथे गेले. दोघांना भंडारा येथे सोडल्याचे अनिरुद्धने नारायण यांना सांगितले. दोघांनी भंडारा गाठले. दोघे बेपत्ता असल्याची तक्रार भंडारा पोलिसांत केली. पोलिसांनी बेपत्ता असल्याची नोंद घेत दोघांचा शोध सुरू केला.
मुलगा व पत्नीची हत्या केल्यानंतर अनिरुद्ध तणावात राहायला लागला. दोघांची हत्या केल्याचा त्याला पश्चात्ताप झाला. मंगळवारी सकाळी त्याने अरोली पोलिस स्टेशन गाठले. पत्नी व मुलाची हत्या करून मृतदेह शेतात पुरल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय पोलिस अधिकारी नयन अलुरकर अरोली पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. अनिरुद्धची चौकशी केली. त्यानंतर पोलिस त्याला घेऊन शेतात गेले. त्याने दोघांचे मृतदेह पुरल्याची जागा दाखविली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले. पंचनामा केला.
धीरज हा वंजारी कॉलेजमध्ये बारावीत विज्ञान शाखेला शिकत होता. त्याला कॉलेजची फी जमा करायची होती. तसेच शिकवणी वर्गासाठीही त्याला पैसे हवे होते. त्यामुळे तो लता यांच्यासह खात येथे गेला, अशी माहिती पोलिसांनी दिली. लता व अनिरुद्ध यांच्यात सतत वाद होत होता. लता यांनी अनिरुद्ध याच्याविरुद्ध पोलिसांत छळाची तक्रार दिली होती. पोलिसांनी अनिरुद्धविरुद्ध छळाचा गुन्हा दाखल केला. गत अनेक वर्षांपासून लता या धीरज याच्यासह हुडकेश्वर भागात भाड्याने राहात होत्या. त्या खासगी काम करीत होत्या.
अधिक वाचा : नागपूरच्या विद्यार्थ्याची दिल्ली रेल्वेस्थानकावर आत्महत्या