जागतिक चॅम्पियन वेटलिफ्टर मीराबाई चानू ने आशियाई स्पधेतून माघार घेतली आहे. तिने वेटलिफ्टींग फेडरेशनला पत्र लिहून आपण तंदुरुस्त नसल्याने आशियाई स्पर्धेतून नाव वगळण्यात यावे अशी विनंती केली आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा यांनी चानूने इंडोनेशियात होणाऱ्या आशियाई स्पर्धेऐवजी नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक पात्रता स्पर्धेवर लक्ष द्यावे असे म्हटले आहे.
मीराबाई चानू गेल्या तीन महिन्यांपासून पाठदुखीने त्रस्त आहे. अजुनही तिला वजन उचलताना त्रास जाणवत असल्याने सराव करणे कठीण जात आहे. गेल्या आठवड्यात बरे वाटल्याने तिने सराव करण्याचा प्रयत्न केला मात्र पुन्हा वेदना सुरु झाल्या. यामुळेच प्रशिक्षकांनी तिला आशियाई स्पर्धेतून माघार घेण्यास सुचवले आहे.
भारताचे मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा यांनी सांगितले की, सोमवारपासून मीराबाई चानू ला पुन्हा वेदना सुरु झाल्या आहेत. तिने जर आराम न करता या स्पर्धेची तयारी सुरु ठेवली तर दुखणे वाढू शकते. हा धोका आम्ही पत्करणार नाही. याबाबत फेडरेशनला कळवले असून आता निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे. आशियाई स्पर्धेपेक्षा ऑलम्पिक महत्त्वाचे असल्याचेही शर्मा यांनी सांगितले.
मीराबाई चानू ने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात ८५ किलोग्रॅम आणि १०९ किलोग्रॅम वजन उचलून सुवर्ण पदक पटकावले होते. तसेच राष्ट्रकुलमध्येही आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना सुवर्ण पदकाची कमाइर् केली होती. त्यामुळे आता आशियाई क्रिडा स्पर्धेतही तिच्याकडून पदकाची अपेक्षा होती. मात्र, चानूने माघार घेतल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे. जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धा नोव्हेंबरमध्ये सुरु होणार आहे. ही ऑलम्पिक पात्रतेसाठीची पहिली स्पर्धा असणार आहे.
अधिक वाचा : पी. व्ही. सिंधू ला उपविजेतेपद