दोन महिन्यांपासून मुलीवर ‘वॉच’

नागपूर

नागपूर : कळमेश्वरमधील पाचवर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याच्या घटनेने संतापाची लाट उसळली असतानाच या घटनेतील नवनवे पैलू आता उघड होत आहेत. नराधम संजय पुरी हा गेल्या दोन महिन्यांपासून मुलीवर ‘वॉच’ ठेऊन होता, अशी धक्कादायक माहिती हाती आली आहे. पोलिसांच्या अटकेत असलेल्या संजयला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची १३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून संजय हा मुलीच्या घराभोवती घिरट्या घालत होता. ती केव्हा-केव्हा कुठे-कुठे जाते, याची माहिती त्याने घेतली. आजोबाकडे जाताना ती एकटीच जात असल्याचेही त्याला कळले. त्यानंतर त्याने मुलीशी संपर्क वाढवायला सुरुवात केली. तो मुलीला कधी चॉकलेट तर कधी तुरीच्या शेंगा द्यायला लागला. त्यामुळे संजयची मुलीसोबत चांगली ओळख झाली. शुक्रवारी मुलगी शाळेतून घरी आली. आजोबाकडे जात असल्याचे सांगून ती घरून निघाली. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ती आजोबाकडून परत घरी जात होती. शेतात संजयने तिला गाठले. तो दारू पिऊन होता. तुरीच्या शेंगा देण्याच्या बहाण्याने संजय हा तिला शेतात घेऊन गेला. तोंडात कापड कोंबून तिच्यावर अत्याचार केला. मुलगी आपले नाव सांगेल, अशा भीतीने संजयने दगडाने डोके ठेचून मुलीची हत्या केली. शेतातीलच झुडपात तिचा मृतदेह लपवून ठेवला. त्यानंतर तो घरी गेला. पुन्हा दारू प्यायली. रक्ताने माखलेले कपडे घरी लपवून तो शेजाऱ्याकडे गेला व रात्री परत घरी आला. जेवण करून झोपी गेला.

दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्याने नातेवाइकांनी तिचा शोध सुरू केला. कळमेश्वर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला. रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मुलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. कळमेश्वरमध्ये तणाव निर्माण झाला. पोलिसांनी अत्याचार, खून, अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून संजयला अटक केली. या अत्याचार व हत्याकांडाचा खटला हा जलदगती न्यायालयात चालविला जाणार आहे. त्यादृष्टीने कळमेश्वर पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. लवकरात लवकर प्रकरणाची चौकशी पूर्ण करण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत.

फरार होणार होता…

मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह कुठे लपवावा, असा विचार संजय करीत होता. शुक्रवारी रात्री मुलीला खड्ड्यात गाडण्याचा विचार त्याच्या मनात आला. सकाळी उठून मुलीला गाडण्याचा निर्णयही त्याने घेतला. मात्र, शनिवारी शेतावर गेल्याने त्याचा हा कट फसला. त्यामुळे शनिवारी रात्री त्याने मुलीचा मृतदेह गंजीत जाळण्याचाही विचार केला. परंतु, यात तो यशस्वी होऊ शकला नाही. रविवारी घटना उघडकीस येताच संजय घाबरला. तो कळमेश्वरमधून फरार होण्याची तयारी करायला लागला. घटना उघडकीस आल्यानंतर सर्वप्रथम संजयवरच पोलिसांचा संशय गेला. वेळीच पोलिसांनी अटक केल्याने संजय याचा हाही ‘प्लान’ फसला.

कळमेश्वर-ब्राह्मणी बंद

पाचवर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ सोमवारी कळमेश्वर-ब्राह्मणी बंदचे आयोजन करण्यात आले होते. या बंदला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे कळमेश्वरमधील बाजारपेठेत सोमवारी शुकशुकाट होता. शाळा व महाविद्यालयांनाही सुटी देण्यात आली होती. हत्याकांडातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, मुलीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीसाठी शेकडो नागरिकांनी सोमवारी पुन्हा कळमेश्वर पोलिस स्टेशनला घेराव घालून घोषणा दिल्या.

कळमेश्वरला छावणीचे स्वरुप

सोमवारी कळमेश्वर बंदचे आवाहन करण्यात आल्यानंतर कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. कळमेश्वरला छावणीचे स्वरूप आले असून, पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकारी तेथे तळ ठोकून आहेत. सावनेर, खापा, केळवद पोलिसांसह राखीव पोलिस दलाची तुकडीही कळमेश्वरमध्ये तैनात करण्यात आली आहे.