नागपूर, ता. ६ : स्वच्छ सर्वेक्षणाच्या दृष्टीने शहरातून एकत्रित होणाऱ्या कचऱ्याचे निर्मितीस्थळावरच विलगीकरण करण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे. संपूर्ण शहरात जरी हा प्रकल्प राबवायचा असला तरी सुरुवातीच्या काळात दोन झोनमधील एक-एक प्रभागात ‘पथदर्शी प्रकल्प’ म्हणून अंमलात आणा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये सहभाग घेण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रशासनातर्फे काय तयारी करण्यात आली आहे, याचा आढावा घेण्यासाठी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्या बोलत होत्या. बैठकीला उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, आरोग्य समिती सभापती मनोज चापले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त सर्वश्री रवींद्र ठाकरे, राम जोशी, अझीझ शेख, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. अनिल चिव्हाणे, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, मोती कुकरेजा, गिरीश वासनिक, हत्तीरोग नियंत्रण अधिकारी जयश्री थोटे, सहायक आयुक्त सर्वश्री सुभाष जयदेव, राजू भिवगडे, हरिश राऊत, अशोक पाटील, राजेश कराडे, गणेश राठोड, श्रीमती स्मिता काळे उपस्थित होते.
महापौर नंदा जिचकार पुढे म्हणाल्या, कचरा विलगीकरण हा स्वच्छ सर्वेक्षणातील महत्त्वाचा मुद्दा आहे. याबाबत जनजागृती मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. हा प्रकल्प टप्प्याटप्प्यात राबविल्यास तो यशस्वी होईल. स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत करावयाच्या बाबी स्पर्धेच्या दृष्टिकोनातून जरी करायच्या असतील तर शहर स्वच्छ होणे, हा त्यामागील उद्देश आहे. आणि त्यासाठी ‘आपले शहर’ ही भावना आधी वृद्विंगत होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. जे नागरिक निर्मितीस्थळीच कचऱ्याचे विलगीकरण करत नसेल, त्यांच्यावर दंड लावा, असेही निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. स्वच्छ सर्वेक्षणात सहायक आयुक्त आणि झोनल अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांच्या जबाबदाऱ्या ठरवून त्यावर अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांनाही विश्वासात घेण्याची सूचना त्यांनी केली.
माजी महापौर प्रवीण दटके म्हणाले, आपण केवळ गुण घेण्यासाठी स्पर्धेत उतरण्यापेक्षा ‘माझे शहर स्वच्छ झाले पाहिजे’ ही भावना घेऊन जर स्पर्धेत उतरलो तर त्याची परिणामकारकता अधिक असेल. यापुढे कुठलेही काम आऊटसोर्सींग न करता अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच व्हावे, अशी सूचना त्यांनी केली. कचरा विलगीकरणासाठी प्रत्येक घरी मॉनिटरींग करणे आवश्यक आहे. कनकच्या माध्यमातून निर्मितीस्थळावरून कचरा विलग करूनच उचलला जावा, असेही ते म्हणाले. स्वच्छता या विषयासाठी एक सहायक आयुक्त आणि एक उपायुक्त दर्जाचा अधिकारी पूर्णवेळ देण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
तत्पूर्वी आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०१९ संदर्भात माहिती दिली. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत यंदा चार घटक असून ‘सर्विस लेवल प्रोग्रेस’, ‘डायरेक्ट ऑब्जर्व्हेशन’, ‘सिटीझन फीडबॅक’ आणि ‘सर्टिफिकेशन’ यांचा समावेश आहे. या प्रत्येक घटकासाठी १२५० गुण असल्याची माहिती डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली. मागील वर्षी ही स्पर्धा ४००० गुणांची होती.
अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी महापौर नंदा जिचकार यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे दोन झोनमधील दोन प्रभागात कचरा विलगीकरण प्रकल्प पथदर्शी म्हणून राबविण्यात येईल, असे सांगितले. सर्व झोन सहायक आयुक्तांनीही अशा एका प्रभागाची निवड या प्रकल्पासाठी करावी, असे निर्देश दिले.
सात दिवसांत नियोजन करा!
स्वच्छ सर्वेक्षणाच्या दृष्टीने संपूर्ण नियोजन तयार करा. जबाबदाऱ्या निश्चित करा. सात दिवसानंतर यासंदर्भात पुन्हा एक आढावा बैठक घेऊन त्यात संपूर्ण नियोजन आणि जबाबदाऱ्यांसह माहिती सादर करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी दिले.