नागपूर : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान लोकशाही पंधरवाडाचे आयोजन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. पंधरवाड्यादरम्यान शहरात विविध ठिकाणी आणि विविध माध्यमातून मतदार नोंदणी करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
शाळा, महाविद्यालये यासह शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये आदींसह सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येणार आहे. वयाची १८ वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक युवक-युवतींनी मतदार यादीत नाव नोंदवावे, ज्यांनी अद्यापही मतदार यादीत नाव नोंदविले नसेल अशा नागरिकांनीही नाव नोंदणी करावी, यासाठी व्यापक प्रमाणावर लोकशाही पंधरवाड्यामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. ही जनजागृती बॅनर्स, होर्डिंग्स, रेडिओ जिंगल्स, टिव्ही, केबल, वर्तमानपत्र आदींच्या माध्यमातून करण्यात येईल. यासोबतच सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य, विविध सार्वजनिक कार्यक्रमात नागपूर महानगरपालिकेतर्फे स्टॉल्स लावून मतदार नोंदणीविषयी माहिती देण्यात येईल. शासकीय कार्यालय, खासगी कार्यालय व अन्य ठिकाणी ‘लोकशाही, निवडणूक व सुशासन’ या विषयावर चर्चासत्र, परिसंवादाचे आयोजन करण्यात येईल. २६ जानेवारी रोजी नागपूर शहरात होत असलेल्या शासकीय, निमशासकीय, खासगी संस्थांच्या ध्वजवंदन कार्यक्रमात सर्व प्रमुख वक्तांच्या भाषणांमध्येही लोकशाही पंधरवाड्यादरम्यान द्यावयाच्या संदेश अंतर्भूत करण्यात येईल.
लोकशाही पंधरवाड्यात राबविण्यात येणारे उपक्रम
लोकशाही पंधरवाड्यात विविध उपक्रम राबवून मतदार नोंदणीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. शहरातील विविध महाविद्यालयात मतदार नोंदणीची माहिती देणारे स्टॉल्स ठेवण्यात येणार आहे. याच ठिकाणी मतदार नोंदणीचे फॉर्मसुद्धा भरून घेण्यात येतील. मतदार नोंदणी करणाऱ्या पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देण्यात येईल. महाविद्यालयांमध्ये सेल्फी कॉर्नर उभारण्यात येईल. ‘मी मतदार यादीत नाव नोंदविणार’ असा फलक घेऊन विद्यार्थी सेल्फी काढतील. हे सेल्फी मनपाच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात येतील. शहरातील व्यापारी, उद्योगपतींची बैठक घेऊन मतदार जनजागृतीसाठी आवाहन करण्यात येईल. १८ व १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची निश्चिती करून त्यांचे नाव मतदार यादीत अंतर्भूत करण्यासंदर्भात जिल्हा निवडणूक कार्यालयाशी महाविद्यालयांचा समन्वय साधण्यात येईल. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून शाळेच्या कमाऊंड वॉलसह मुख्य मार्गिका, शहरातील दळणवळणाच्या प्रमुख ठिकाणी मतदार जागृतीबाबत आकर्षक सचित्र संदेश रंगविण्यात येईल. मतदार यादीत महिला मतदारांची टक्केवारी कमी आहे अशा मतदान केंद्रांचा शोध घेऊन महिला मतदारांच्या नाव नोंदणीकरिता विशेष मोहीम राबविण्यात येईल. मान्यवरांच्या उपस्थितीत जनसामान्यांची ‘चुनाव पाठशाला’ आयोजित करण्यात येईल. ‘निवडणूक सुधारणा-उपाययोजना’ या विषयावर एक दिवसाचे चर्चासत्र घेण्यात येईल. शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मतदार जागृती मोहीम राबविण्यात येईल. मनपाच्या अधिकृत फेसबुक पेज आणि ट्विटर हॅण्डलवर लोकशाही पंधरवाड्यादरम्यान जनजागृतीसाठी विविध क्रिएटीव्ह अपलोड करण्यात येईल. शहरातील स्मार्ट स्क्रीनवरूनही लोकांना माहिती देण्यात येईल.
पूर्वतयारी उपक्रम
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने लोकशाही पंधरवाड्यानिमित्त राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी पूर्वतयारी म्हणून विविध उपक्रम सध्या राबविण्यात येत आहेत. फुटाळा तलाव येथे वर्ल्ड ऑरेंज फेस्टिवलदरम्यान स्वाक्षरी मोहीम, वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या ‘युथ एम्पॉवरमेंट समीट’मध्ये मतदार जागृतीसंदर्भात स्टॉल लावण्यात आला. सेल्फी कॉर्नर तयार करून युवा वर्गाला मतदार नोंदणीबाबत सांगण्यात आले. महिला उद्योजिका मेळाव्यात स्टॉल, सेल्फी कॉर्नर, मतदार जागृतीचा संदेश असलेला बलून आकाशात सोडण्यात आला. कमला नेहरू महाविद्यालयात स्नेहमिलन कार्यक्रमात लोकशाही पंधरवाडाबाबत माहिती देण्यात आली. खासदार क्रीडा महोत्सवादरम्यान प्रताप नगर येथील समर्थ व्यायाम शाळेच्या मैदानावरही तेथे उपस्थितांना लोकशाही पंधरवाडाबाबत माहिती देण्यात आली.
अधिक वाचा : कमला नेहरू महाविद्यालयात लोकशाही पंधरवाडा जनजागृती