नागपूर :- विदर्भातील प्रतिभावंत गायक कलावंतांसाठी व्यासपीठ ठरलेल्या ‘व्हाईस ऑफ विदर्भ’ च्या प्राथमिक फेरीला वैदर्भीय कलावंतांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला आहे. नागपूर महानगरपालिका व लकी इव्हेन्ट्स ॲण्ड म्युझिकल एंटरटेनमेन्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एक्सेल इव्हेंटस् सोल्यूशन्स ॲन्ड सर्विसेस यांच्या सहकार्याने कविवर्य सुरेश भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवार व रविवार दोन दिवस अमृत भवन येथे ‘व्हाईस ऑफ विदर्भ’ स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात आली. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एकूण 800 च्या वर स्पर्धकांनी सहभाग घेतला असून यामधून 118 स्पर्धकांची उपांत्य फेरीसाठी निवड झाली आहे.
येत्या 28 जुलैला ‘व्हाईस ऑफ विदर्भ’ ची उपांत्य फेरी होणार आहे. प्राथमिक फेरीच्या दुसर्या दिवशी रविवारी विदर्भातील कलावंतांसह नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी व मनपाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी दोन्ही दिवशी योगेश ठक्कर, शालिनी सिन्हा, श्री. बोढे, विजय चिवंडे, पं. जयंत इंदूरकर, सुनील वाघमारे, सारंग जोशी, प्रदीप गोंडाणे, मनिषा देशकर यांनी परीक्षकांची भूमिका पार पाडली.
10 स्पर्धकांना मिळणार ‘सा रे गा मा पा’ रिएलिटी शो मध्ये सहभागाची संधी येत्या 28 जुलैला होणाऱ्या ‘व्हाईस ऑफ विदर्भ’ ची उपांत्य फेरीतून 14 वर्षाखालील व 14 वर्षावरील गटातून प्रत्येकी 10 म्हणजे दोन्ही गटातील 20 गायक कलावंतांची निवड होणार आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजेत्या ठरणाऱ्या कलावंतांना २१,००० रुपये प्रथम,११,००० रुपये द्वितीय व ७००० रुपये तृतीय असे रोख बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या 16 ते 35 वर्ष वयोगटातील 10 स्पर्धकांना झी टीव्ही वर सुरू होणाऱ्या’ सा रे गा मा पा’ रिएलिटी शो मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
४ ऑगस्टला महाअंतिम फेरी
कविवर्य सुरेश भट यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित ‘व्हाईस ऑफ विदर्भ’ची महाअंतिम फेरी ४ ऑगस्ट रोजी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात होणार आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या आयोजनासाठी मनपा क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांच्यासह लकी म्युझिकल ग्रुपचे संचालक लकी खान, हर्षल हिवरखेडकर यांनी सहकार्य केले.
अधिक वाचा : मेघा धाडे ठरली पहिल्या मराठी बिग बॉसची विजेती