दुबई – इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला निसटता पराभव पत्करावा लागला असला तरी भारताचा कर्णधार विराट कोहली साठी मात्र ही कसोटी चांगलीच फलदायी ठरली आहे. पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डवात अर्धशतक फटकावत विराटने अखेर कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थान गाठण्यात यश मिळवले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दमदार फलंदाजीच्या जोरावर विराटने ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्हन स्मिथला मागे टाकत कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानाला गवसणी घातली. कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थान पटकावणारा विराट कोहली हा भारताचा केवळ सातवा फलंदाज आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतील पहिल्या डावात त्यानं कारकिर्दीतील 22 वं शतक ठोकलं. त्यानं या डावात 149 धावा कुटल्या. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्यानं 51 धावांची झुंजार खेळी केली. या कामगिरीच्या जोरावर त्याचे कसोटीत 934 गुण झाले. त्यानं ऑस्ट्रेलियाच्या स्मिथला (929) मागे टाकून जागतिक क्रमवारीत पहिलं स्थान मिळवलं. 2011मध्ये सचिन तेंडुलकरनं जागतिक कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान मिळवलं होतं. सात वर्षांनी कोहलीनं ही कामगिरी केली आहे.
अधिक वाचा : १९ सप्टेंबरला आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने