नागपूर: क्रिकेटविश्वात ‘रनमशीन’ अशी आपली ओळख निर्माण करणारा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आणखी एक यशोशिखर गाठलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० वर्षांत २० हजार धावा करण्याचा विश्वविक्रम विराटने आता आपल्या नावावर केला आहे. असा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
विराट कोहलीने बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेतील तिसऱ्या व अंतिम वनडेत खणखणीत शतक झळकावलं. वनडेतील हे त्याचं ४३ वं शतक ठरलं. या शतकाच्या जोरावर भारताने शानदार विजय साकारला व तीन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. या शतकी खेळीबरोबरच ३० वर्षीय विराटने १० वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत २० हजार धावांचा टप्पा ओलांडत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
१० वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावा करणारा विराट हा आता एकमेव फलंदाज आहे. विराटनंतर सर्वाधिक धावा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावावर आहेत. पाँटिंगने १० वर्षांत १८ हजार ९६२ धावांचा टप्पा गाठला होता तर दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक कॅलिस या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्याने १० वर्षांत १६ हजार ७७७ धावा केल्या होत्या. श्रीलंकेचा शैलीदार फलंदाज महेला जयवर्धनेच्या नावावर १० वर्षांत १६ हजार ३०४ धावांची नोंद आहे. कुमार संगकाराने १० वर्षांत १५ हजार ९९९, सचिन तेंडुलकरने १५ हजार ९६२, राहुल द्रविडने १५ हजार ८५३ तर हाशिम आमलाने १५ हजार १८५ धावा केल्या.
सचिनच्या विक्रमाची बरोबरी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या संघाविरुद्ध वनडेत भारताकडून सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने वनडेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ शतके झळकावली होती. विराटने पोर्ट ऑफ स्पेन वनडेत या विक्रमाची बरोबरी केली. विराटचं हे वेस्ट इंडिजविरुद्धचं नववं शतक ठरलं. वनडेत कर्णधार म्हणून खेळताना सर्वाधिक शतके रिकी पाँटिंगच्या नावावर असून आणखी एक शतक झळकावताच विराट या विक्रमाची बरोबरी साधणार आहे.