भारताच्या विनेश फोगट हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. आशियाई स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती भारताची पहिलीच महिला कुस्तीगीर ठरली.
महिलांच्या ५० किलो गटात विनेश सुरुवातीपासूनच पदकाची प्रबळ दावेदार मानली जात होती. तिने अंतिम फेरीत जपानच्या युकी इरीला ६-२ असे नमविले. २३ वर्षीय हरियाणाच्या विनेशची ही कारकिर्दीतील सर्वांत मोठी कामगिरी ठरली. विशेष म्हणजे फोगट कुटुंबातील आणखी एका मुलीने ‘आखाडा’ गाजविला. विनेशने २०१६च्या रिओ ऑलिंपिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली होती. मात्र, गुडघ्याच्या दुखापतीमुळे तिला पराभव पत्करावा लागला. मात्र, या वेळी ‘एशियाड’मध्ये विनेश पूर्ण तयारीनिशी उतरली होती. तिने सुरुवातीपासूनच इरीवर वर्चस्व राखले.
पहिल्या फेरीनंतर तिने ४-० अशी आघाडी घेऊन विजयाचा पाया रचला होता. यानंतर दुसऱ्या फेरीत इरीने तिला चांगली लढत दिली. मात्र, आघाडी गमावणार नाही, याची काळजी तिने घेतली. या फेरीत दोघींनी २-२ गुण मिळवले आणि विनेशने ही लढत ६-२ अशी जिंकली.
तत्पूर्वी, विनेशने पहिल्या लढतीत चीनच्या सन याननला ८-२ असे सहज नमविले. यानंतर उपांत्यपूर्व फेरीत कोरियाच्या हायुंगजू किमवर मात केली. यात ती तांत्रिकदृष्ट्या सरस ठरली. यानंतर उपांत्य फेरीचा अडथळा पार करण्यासाठी तिला अवघे ७५ सेकंद पुरेसे ठरले. तिने उझबेकिस्तानच्या याखशिमुरातोवा दाउलेटबिकवर सहज विजय मिळवला.
अधिक वाचा : Asian Games 2018: 19-year old Lakshay bags silver in Men’s Trap shooting