मुंबई: मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं. त्या ७२ वर्षांच्या होत्या. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुभांगी जोशी यांच्या निधनामुळं यांच्या सहकलाकारांना धक्का बसला आहे.
शुभांगी जोशी यांना रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होता. मागील आठवड्यात पॅरालिसीसचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र, त्यात यश आलं नाही. त्यांची प्रकृती उत्तरोत्तर खालावतच गेली आणि आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
‘काहे दिया परदेस’ या मालिकेत शुभांगी जोशी यांनी साकारलेली गौरीच्या आजीची भूमिका विशेष गाजली होती. मालवणी लहेजातील त्यांचे संवाद, मोहन जोशी यांच्याशी उडणारे खटके हे सगळं प्रेक्षक अजूनही विसरले नाहीत. सध्या त्या ‘कुंकू टिकली आणि टॅटू’ या मालिकेत काम करत होत्या. त्यातील त्यांची जिजीची भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती. त्यांच्या अचानक जाण्यानं सहकलाकारांना धक्का बसला आहे. ‘आभाळमाया’ या मालिकेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.
अधिक वाचा : राष्ट्रसंत जैन मुनी तरूण सागर महाराज यांचे दीर्घ आजाराने निधन