महापौर चषक वंदे मारतम् समूहगान स्पर्धें’मुळे शहराचे स्थान उंचावत आहे. मागील २२ वर्षांपासून नियमित सुरू असलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या मनात देशाभिमान निर्माण होतो. दिवसेंदिवस स्पर्धेची गुणवत्ता वाढत असून स्पर्धेमुळे शहराला वेगळी ओळख मिळाली आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
त्या नागपूर महानपालिकेच्या वतीने रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित महापौर चषक वंदे मातरम् समूहगान स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात बोलत होत्या. महापौर चषक वंदे मातरम् समूहगान स्पर्धेच्या अंतिम फेरीत इयत्ता ९ ते १० वी या गटात मॉडर्न पब्लिक स्कूल कोराडी रोड, ६ ते ८ वी गटात द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल शंकरपूर व पहिली ते पाचवी गटात द ब्लाईंड बॉईज इन्स्टिट्युटने बाजी मारीत प्रथम क्रमांक पटकाविला.
बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, शिक्षण समिती उपसभापती भारती बुंदे, हनुमाननगर झोन सभापती रुपाली ठाकूर, नगरसेविका स्वाती आखतकर, नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, भगवान मेंढे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, देवेन दस्तुरे यांच्यासह अंतिम फेरीचे परीक्षक शहरातील सुप्रसिद्ध गायक एम.ए. कादर, सुप्रसिद्ध गायिका आकांक्षा नगरकर, आशितोष पळसकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, मागील २२ वर्षापासून मनपाने सुरू केलेल्या या उपक्रमाला मनपाच्या शाळांसह शहरातील इतरही शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणाऱ्या शिक्षण विभागाचे यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी अभिनंदन केले. स्पर्धेमध्ये यावर्षी मनपाच्या १९ व इतर ८२ अशा एकूण १०१ शाळांनी सहभाग घेतला. पुढील वर्षी यावर्षी पेक्षा अधिक शाळांना या स्पर्धेमध्ये सहभागी करू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
स्वातंत्र्यदिनाला वंदे मातरम् सर्वत्र गायले जाते, मात्र यामधील फक्त एकच कडवा गायला जातो. इतिहासात काही आक्षेप आल्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी एकच कडवे गायनास मान्यता दिली होती. तेव्हापासून ती सुरू आहे. मात्र नागपूर महानरपालिकेने पुढाकार घेत १९९६ ला तत्कालिन महापौर कुंदाताई विजयकर यांच्या नेतृत्वात संपूर्ण वंदे मातरम् समूहगान स्पर्धेचे आयोजन सुरू करून देशात नवा उपक्रम सुरू केला असल्याचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी यावेळी सांगितले. देशभक्तीच्या अनेक ऐतिहासिक घटनांवर प्रकाश टाकित त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रथम क्रमांक विजेत्यांना १० हजार पुरस्कार
महापौर चषक वंदे मातरम् समूहगान स्पर्धेमध्ये इयत्ता ९ ते १० वी या गटात मॉर्डन पब्लिक स्कूल कोराडी रोडने प्रथम, भवन्स भगवानदास पुरोहित विद्यामंदिर त्रिमुर्तीनगरने द्वितीय, ललिता पब्लिक स्कूल वर्धमाननगर कोराडी रोड संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. याशिवाय मनपाच्या बॅ. शेषराव वानखेडे विद्यानिकेतनला उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आले. ६ ते ८ वी या गटात द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल शंकरपूर, भवन्स भगवानदास पुरोहित विद्यामंदिर श्रीकृष्णनगर, साउथ पॉईंट स्कूल ओंकारनगरने अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसरे स्थान राखले. तर संजुबा हायस्कूल बहादुराने उत्तेजनार्थ व नेताजी मार्केट हिंदी माध्यमिक मनपा शाळेने प्रोत्साहन पुरस्कार पटकाविला.
तिसऱ्या पहिली ते पाचवीच्या गटात द ब्लाईंड बॉईज इन्स्टिट्युटने पहिल्या, जुना सुभेदार ले-आउट मानेवाडा येथील दुर्गानगर उच्च प्राथामिक शाळेने दुसऱ्या व द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल शंकरपूर संघाने तिसऱ्या स्थानावर बाजी मारली. या गटात ग्रेट ब्रिटेन कॉन्व्हेंट शांतीनगर व आदर्श संस्कार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने क्रमश: उत्तेजनार्थ व प्रोत्साहन पुरस्कार मिळविले.
तिन्ही गटातील प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या संघांना प्रत्येकी १० हजार रुपये रोख पुरस्कार व विजयी चषक प्रदान करण्यात आले. दुस-या स्थानावरील विजेत्यांना सात हजार रोख तर तिसऱ्या स्थानावरील विजेत्यांना पाच हजार रुपये रोख पुरस्कारासह चषक प्रदान करून गौरविण्यात आले. प्रोत्साहन पुरस्कार विजेत्या शाळांना प्रत्येकी तीन हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले. सर्व विजेत्यांना महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
स्पर्धेच्या आयोजनासाठी परिश्रम घेणारे क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, माधुरी धवड, संध्या पवार, लता कनाटे व मधु कराड यांना महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीपासून ते अंतिम फेरीपर्यंत लाभलेले परीक्षक एम.ए. कादर, आशितोष पळसकर, विनोद मांडवकर, अनुजा मेंगड, निरंजन सिंग, बोरीकर, गायकवाड यांनाही महापौरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांनी केले. संचालन मधु कराड यांनी केले. आभार अनिता हलमारे यांनी मानले.
अधिक वाचा : तिरंगे के रंगों से जगमगाने लगा नागपुर रेलवे स्टेशन