नागपूर :- शहरात मेट्रोसह सुमारे आठ एजंसीजचे काम सुरु आहे. विकासकामे आणि पाऊस यामुळे मुख्य रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. नागरिकांच्या दररोज तक्रारी येत आहे. कुठलीही एजंसी खोदकाम करीत असेल तर खड्डे तातडीने बुजविणे हे एजंसीचे काम आहे आणि ज्या रस्त्यांवर त्यांचे काम सुरू आहे, त्या रस्त्यांवरील खड्डेही भरणे हे प्राधान्याने करणे आवश्यक आहे. त्यामुळे मेट्रो, नागपूर सुधार प्रन्यास, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, मनपा, ओसीडब्ल्यू, एसएनडील यासह अन्य एजन्सीने तातडीने खड्डे बुजवून नागरिकांना त्रासातून मुक्त करावे, असे निर्देश स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.
नागपूर शहरातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आमदार सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाचे विशेष कार्य अधिकारी सुधीर देऊळगांवकर, मनपाच्या कर आकारणी समितीचे सभापती संदीप जाधव, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, मुख्य अभियंता मनोज तालेवार, नागपूर महानगर विकास प्राधिकरणचे महाव्यवस्थापक अजय रामटेके, नासुप्रचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार, रेल्वेचे, मेट्रो, वीज वितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
सदर बैठकीत सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी वंजारी नगर ते रेल्वे मेन्स शाळादरम्यानचा प्रस्तावित डी.पी. रोड, शहरातील विविध सीमेंट रस्त्यांच्या चौकाचे सौंदर्यीकरण, पावसाळ्यामध्ये विविध रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती, नवीन सीमेंट रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या विद्युत खांबांना हटविणे आणि टेका नाका परिसरातील माता मंदिराला जागा मिळण्याबाबतच्या विषयांवर संबंधित विभागातर्फे आढावा घेण्यात आला.
खड्ड्यांचा विषय गंभीर असून यामुळे नागपूर महानगरपालिकेवर ताशेरे ओढले जात आहे. संबंधित विभागाने ही खड्डे तातडीने बुजविण्याचे काम सुरू करावे आणि गणेशोत्सवापूर्वी काम पूर्ण करावे, असे निर्देश सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले. वंजारी नगर ते रेल्वे मेन्स शाळेदरम्यानचा डी.पी. रस्त्यासाठी रेल्वेकडून जमीन लीजवर घेण्यात यावी, तसा प्रस्ताव तातडीने रेल्वेकडे पाठवून करार करण्यात यावा. हा रस्ता विशेष बाब म्हणून तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नव्याने बांधण्यात आलेल्या सीमेंट रस्त्यांवरील वीज खांबामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. हे काम तातडीने करण्यात यावे. यासाठी मनपाचा विद्युत विभाग, वीज कंपनी आणि एसएनडीएल यांनी समन्वयाने हा विषय हाताळावा. यासाठी लागणाऱ्या निधीची उपलब्धता नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत करण्यासाठी नगरविकास मंत्रालयाकडे तसा प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश सभापती श्री. कुकरेजा यांनी दिले.
नागपूर शहराला सहा रुग्णवाहिका, सहा शववाहिका देण्यासाठी निधीची उपलब्धता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खासदार निधीतून करून देण्यात आली आहे. मात्र, रुग्णावाहिका, शववाहिका अद्यापही सेवेत आल्या नाही. याबाबत चौकशी करून रुग्णवाहिकांची खरेदी तातडीने करावी, असे निर्देश सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी मनपा प्रशासनाला दिले. वाठोडा येथे तयार होत असलेल्या सिम्बॉयसीस विद्यापीठापर्यंत रिंगरोडपासून रस्ता तयार करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. बैठकीला कार्यकारी अभियंता राजेश भूतकर, गिरीश वासनिक, मोती कुकरेजा, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल यांच्यासह संबंधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
अधिक वाचा : गोरेवाड़ा जंगल में जल्द शुरू होगी इंडियन, अफ्रीकन सफारी : जेवीसी करेगी प्रोजेक्ट पूरा