नागपुर : विदर्भात आजही अनेक समस्या असून या समस्या सुटण्यासाठी वेगळ्या विदर्भाची गरज आहे. वेगळा विदर्भ राज्याबाबत १ मे १९६० ला जो निर्णय झाला, त्या निर्णयातील बऱ्याच गोष्टी पाळल्या गेल्या नाहीत. त्यामुळे विदर्भातील सिंचन अनुशेष कायम आहे. याबाबत आपण एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे वेगळ्या विदर्भाची मागणी करणार आहोत, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गडचिरोली येथे दिली.
गुरुवारी आठवले गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे ते म्हणाले, वेगळ्या विदर्भाची मागणी योग्य आहे. मात्र मागणी केल्याने ती पूर्ण होणार नसून त्यासाठी आंदोलनाची गरज आहे. त्यामुळे कुणीतरी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तेव्हाच विदर्भ राज्य वेगळे होईल. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद ही मुख्य समस्या आहे. नक्षलवाद्यांची मागणी रास्त असो अथवा नसो, हिंसक मार्गाने गरिबांच्या समस्या सुटणार नाही. त्यामुळे नक्षलवाद्यांनी अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करावे. त्यांनी आत्मसमर्पण करुन विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दरम्यान, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेतला. सामाजिक न्याय विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवून त्या योजनांचा थेट लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्याचे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले आहेत.
अधिक वाचा : सरदार वल्लभभाई पटेल जयंती : नागपूर में शहर पुलिस के द्वारा स्कूटर रैली का आयोजन