नागपूर : दोन दिवसांपूर्वी खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या मामा भाच्याचे मृतदेह रात्री उशिरा नाल्याच्या शेजारी आढळून आल्याची घटना हिंगणा तालुक्यात समोर आली आहे. उमेश दयाराम मरस्कोल्हे (वय ३४) व सागर विनोद आत्राम (वय १४) दोघेही रा.खडकी अशी मृतांची नावे आहेत. उमेश हा सागरचा मामा होता.
उमेश दयाराम मरस्कोल्हे हे आपला भाचा सागरसह दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा खेकडे पकडण्यासाठी हिंगणा तालुक्यातील किन्ही शिवारातील नाल्यावर गेले होते. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंतही ते घरी परतले नाही. त्यामुळे उमेशच्या आईवडिलांनी हिंगणा पोलिसात तक्रार दाखल केली. दोन दिवसांपासून मृतकांच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी संपूर्ण हिंगणा परिसर पिंजून काढला. त्याचवेळी हिंगणा पोलीसही उमेश आणि सागरला शोधण्यासाठी प्रयत्न करत होते.
दरम्यान, किन्ही शिवारातील शेतकऱ्यांना खडकी परिसरातील शेतनाल्याच्या बाजूला उमेश आणि सागर या दोघांचेही मृतदेह आढळून आले. त्यांनी तत्काळ हिंगणा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरीता पाठवले आहेत. आज शवविच्छेदन झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. दोन्ही मृतदेह शेजारीच पडून होते. परंतु, त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे प्रथमदर्शनी कळू शकले नाही. त्यामुळे दोघांचा मृत्यू हा अपघाती आहे की घातपात याचा तपास हिंगणा पोलीस करीत आहेत.
अधिक वाचा : रेल्वेमधून दारू तस्करी करणाऱ्या आरोपीला नागपुरात अटक