नागपूर: भारतात उबरची सेवा अधिक गतिमान करण्यासाठी कंपनीनं पावलं उचलली आहेत. बुकिंग करणं सोप्पं जावं यासाठी कंपनी लवकरच स्थानिक भाषा आणि ‘एसएमएस’द्वारे ग्राहकांना बुकिंगची सुविधा करून देणार आहे. अनेकांना उबरची बुकिंग करायची पुरेशी माहिती नसल्याने ते उबरऐवजी अन्य वाहनांचा मार्ग अवलंबतात. अशा लोकांना एसएमएस आणि स्थानिक भाषेत कार बुक करणं आता शक्य होणार आहे. सध्या याची चाचणी सुरू आहे.
उबरची कार बुक करण्यासाठी ग्राहकांकडे फोरजी मोबाइल आणि इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे. कंपनी सध्या एका प्रोजेक्टवर काम करीत आहे. याअंतर्गत एक कॉल सेंटर सुरू करण्यात येणार असून यामुळे ग्राहकांना रायडर्स कॅब बुक करता येऊ शकणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच ग्राहकांना उबरची बुकिंग ऑफलाइन करता येणार आहे. सध्या उबरची बुकिंग ही कंपनीच्या अॅपमधून करण्यात येतेय. उबर कंपनीने खर्च टाळण्यासाठी कॉल सेंटर उघडले नव्हते. परंतु, आता कंपनीनं ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्थानिक कॉल सेंटर उघडण्याची तयारी दर्शवली आहे.
कंपनीकडे आधीपासून ड्रायव्हर्ससाठी कॉल सेंटर आहेत. आता ग्राहकांसाठीही कॉल सेंटर उघडले जाणार आहेत. या नव्या फीचरमुळे ऑनलाइन बुकिंग करता येऊ न शकणाऱ्या ग्राहकांना फायदा होणार आहे. आमच्या ग्राहकांना आपल्या स्थानिक भाषेत एसएमएस किंवा कॉल करून राईड बुक करता यावी, यासाठी आम्ही हे पाऊल उचलल्याची माहिती उबर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने दिली.
अधिक वाचा: नागपूर – सरकारी कर्मचाऱ्यांना झटका; PF वरील व्याज घटले