मुंबई : बांगलादेशविरुद्धच्या टी-२० आणि टेस्ट सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा झाली आहे. पण या टीममध्ये जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांची निवड झालेली नाही. हे दोघंही यावर्षी खेळू शकणार नाही, असं बीसीसीआयने सांगितलं आहे. या दोघांची दुखापत गंभीर असल्यामुळे त्यांना संधी देण्यात येणार नाही. जसप्रीत बुमराहच्या कंबरेला छोटं फ्रॅक्चर झालं आहे. आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी बुमराहची दुखापत समोर आली होती. त्यामुळे बुमराहऐवजी उमेश यादवला संधी मिळाली होती.
दुसरीकडे हार्दिक पांड्याच्या पाठीवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पांड्याला या दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत. मागच्या वर्षभरापासून पांड्या पाठीच्या दुखण्याने त्रस्त होता.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये यूएईमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या आशिया कपच्या सामन्यात पांड्याच्या पाठीला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला स्ट्रेचरवरुन मैदानबाहेर आणण्यात आले होते. या दुखापतीनंतर तो स्पर्धेबाहेर झाला होता. यानंतर पांड्या आयपीएल आणि वर्ल्ड कपमध्येही खेळला होता. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मॅचमध्ये पांड्याला पुन्हा त्रास झाला.
भारताचा आणखी एक फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमारच्या पायाला दुखापत झाली आहे. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजमध्ये भुवनेश्वर कुमारचं पुनरागमन व्हायची शक्यता आहे.
बांगलादेशविरुद्ध भारत ३ टी-२० आणि २ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. या सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा झाली आहे. टी-२० सीरिजसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे.
भारतीय टी-२० टीम
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, युझवेंद्र चहल, राहुल चहर, दीपक चहर, खलील अहमद, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर
भारतीय टेस्ट टीम
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋद्धीमान सहा, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुभमन गिल, ऋषभ पंत
बांगलादेश सीरिजचं वेळापत्रक
३ नोव्हेंबर- पहिली टी-२०- दिल्ली
७ नोव्हेंबर- दुसरी टी-२०- राजकोट
१० नोव्हेंबर- तिसरी टी-२०- नागपूर
१४ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर- पहिली टेस्ट- इंदूर
२२ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर- दुसरी टेस्ट- कोलकाता