कन्नौज जिल्ह्यामध्ये तिर्वा पोलीस ठाणे हद्दीत एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली. नवरी एक होती आणि तिच्याशी लग्न करण्यासाठी दोन नवरदेव पोहोचले. एक तरुण लग्न ठरल्याने वरात घेऊन आला तर दुसरा तिचा प्रियकर देखील तिथे वाजत गाजत वरात घेऊन आला. एकाच वेळी दोन दोन वराती पाहून गाववाले देखील दंग झाले. मग काय प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले.
तासंतास चाललेल्या पंचायतमध्ये नवरीने तिच्या प्रियकराची निवड केली. मात्र, आता अरेंज मॅरेज ठरलेल्या नवरदेवाचे काय करायचे? असा प्रश्न निर्माण झाला. तिथेही शेवटी तोडगा काढलाच. नवरदेवाचा पडलेला चेहरा पाहून गावातील एका कुटुंबाने त्यांच्या मुलीचे त्याच्याशी लग्न लावून दिले. गुरुवारी रात्री सौरिख ठाणे क्षेत्रात नवरदेव वरात घेऊन पोहोचला होता.
झाले असे, दरवाजावर वरात पोहोचताच सर्वांनी खऱ्या नवरदेवाचे स्वागत केले. सर्व कार्यक्रम उरकत नाहीत तोच नवरीचा प्रेमी वरात घेऊन तिच्या गल्लीत पोहोचला. त्याला पाहताच नवरीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. तिने लगेच घरी आलेल्या नवरदेवासोबत लग्नाला नकार दिला. हे कळताच वऱातींनी पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी नवरी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होऊ लागली.
इंटरेस्टिंग म्हणजे त्या प्रियकराचेही लग्न ठरलेले. त्याचे लग्न 23 जूनला होते, त्यांनाही कोणीतरी खबर दिली. ते देखील कोतवाली पोलीस ठाण्यात येऊन पोहोचले आणि या लग्नाला विरोध करू लागले. चार वधू-वराचे पक्ष आणि पोलीस अशी चर्चा होऊ लागली. शेवटी गावची पंचायत बोलविण्यात आली. खूप तास चाललेल्या या बैठकीत नवरीच्या कुटुंबियांनी खऱ्या नवरदेवाने दिलेले दागिने आणि इतर साहित्य परत केले. नवरदेवाने देखील त्यांच्याकडून घेतलेली बाईक मागे दिली.
प्रकरण एवढ्यावर थांबेल कसे, तिच्या प्रियकराने देखील त्याची ज्यांच्याशी सोय़रिक झालेली त्या चौथ्या पक्षाला सामान परत दिले. तसेच चारही पक्षांमध्ये समजुतीने ठरलेली लग्न रद्द करण्यात आली. आता त्या नवरीचे तिच्या प्रियकराशी लग्न होणार होते. परंतू जो नवरदेव होता त्याची वरात रिकामीच मागे कशी पाठवायची असा प्रश्न निर्माण झाला. शेवटी त्या गावातील एका कुटुंबाने आपल्या मुलीशी त्या नवरदेवाचे लग्न लावून दिले आणि तिढा सोडविला.