महासंकटाच्या काळात ‘मैत्री’चा आधार मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली प्रशंसा : किचनला भेट देऊन सेवाव्रतींचा वाढविला उत्साह

Date:

नागपूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असताना बाहेरगावचे असलेले आणि नागपुरात अडकलेले विद्यार्थी, निराधार ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि नागपुरात अडकलेल्या बाहेरगावच्या व्यक्तींच्या मदतीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या आवाहनाला साद देत अनेक सामाजिक संस्था धावून आल्या. मनपाच्या नेतृत्वात या सामाजिक संस्थांनी अशा व्यक्तींना आधार दिला. यातीलच एक संस्था म्हणजे मैत्री परिवार. अन्नदानाचे महत्‌कार्य करीत ‘मैत्री’ने गरजूंना दिलेला आधार लाख मोलाचा ठरत आहे.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील अशा व्यक्तींच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्थांना हाक दिली. शहरातील २७ ठिकाणी कम्युनिटी किचन उघडून ज्या व्यक्तींना भोजनाची आवश्यकता आहे अशा व्यक्तींना दोन वेळचे भोजन पुरविण्याचे कार्य नागपूर महानगरपालिकेने सुरू केले. यामध्ये शहरातील अग्रणी सेवाभावी संस्था ‘मैत्री परिवारा’चे कार्य प्रशंसनीय ठरले आहे.

मैत्री परिवाराने २५ मार्चपासून लॉकडाऊनच्या काळात बाहेरगावचे होस्टलवर किंवा रुमवर राहणारे विद्यार्थी ज्यांच्याकडे जेवणाची काही सोय नाही अशांना भोजन पुरविण्याची व्यवस्था उभारली. प्रारंभी ४१६ व्यक्तींना कोतवाली पोलिस ठाण्याच्या माध्यमातून भोजन पुरविण्याची सुरुवात झाली. हळूहळू हा आकडा वाढत गेला. २९ मार्चपासून मैत्री परिवाराने संस्थेच्या नेटवर्कच्या माध्यमातून सेवा देण्यास प्रारंभ केला. आज सुमारे २५०० विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आदींना फूड पॅकेट पोहचविण्यात येतात.

मैत्री परिवाराच्या किचनमधून तयार झालेल्या फूड पॅकेटस्‌पैकी ८७३ व्यक्तींना मैत्री परिवार स्वयंसेवकांच्या माध्यमातून, १७५ फूड पॅकेटस्‌ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून, १०० फूड पॅकेटस्‌ कोतवाली पोलिस ठाण्याच्या माध्यमातून तर ३०० फूड पॅकेटस्‌ नागपूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पोहचविण्यात येतात. हा आकडा दररोज बदलत असतो.

दोन किचन आणि शेकडो स्वयंसेवक

मैत्री परिवार दोन किचनच्या माध्यमातून सामाजिक अंतराचे भान राखत शेकडो स्वयंसेवकांच्या मदतीने अन्नदानाचे कार्य करीत आहे. मैत्री परिवारातर्फे संचालित सुरेंद्र नगर येथील वसतिगृहात एक स्वयंपाकघर तयार करण्यात आले आहे तर दुसरे स्वयंपाकघर धरमपेठ येथील वझलवार लॉन येथे सिटीझन ॲक्शन ग्रुपच्या सहकार्याने तयार करण्यात आले आहे. येथे निर्जंतुकीकरण नियमित करण्यात येते. या दोन्ही स्वयंपाकघरात सकाळी ५ वाजतापासून स्वयंपाकाला सुरुवात होते. दुपारी १२ वाजताच्या आत गरजूंना फूड पॅकेट पोहचविले जातात. विशेष म्हणजे हे अन्न जीवनसत्व युक्त असून त्यात वैविध्य असते. या काळात नागरिकांना श्रीखंड, बुंदीचे लाडू, या मिष्ठान्नासोबतच फळेसुद्धा दिली जातात. अन्न वितरणाच्या दृष्टीने मैत्री परिवाराने संपूर्ण शहराची विभागणी १४ झोनमध्ये केली आहे. वितरणासाठी १४ वाहने असून वाडी, हिंगणा, पारडी, उमरेड रोड, हुडकेश्वर, काटोल रोड आदी दूरवरच्या भागातही अन्न पुरविले जात आहे. विशेष म्हणजे या फूड पॅकेट्सव्यतिरिक्त १५०० अतिरिक्त चपात्याही गरजूंना पुरविल्या जातात. मागणी आल्यानंतर संबंधित व्यक्तींकडून आधार कार्ड, महाविद्यालयाचे ओळखपत्र किंवा कर्मचारी असेल तर कार्यालयाचे ओळखपत्र घेतले जाते. संबंधित व्यक्ती खरंच गरजू आहे अथवा नाही याची शहानिशा केल्यानंतरच त्याला सेवा पुरविली जाते.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली भेट

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी (ता. १८) सुरेंद्रनगर आणि धरमपेठ येथील दोन्ही स्वयंपाकघराला भेट देऊन मैत्री परिवार आणि कॅगच्या सेवाकार्याची प्रशंसा केली. मैत्री परिवाराचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे प्रा. प्रमोद पेंडके, कॅगचे विवेक रानडे, श्रीपाद इंदोलीकर यांच्याशी चर्चा केली. मैत्री परिवार या महासंकटसमयी करीत असलेल्या कार्याला तोड नाही. भविष्यात जर गरज पडली तर नागपूर महानगरपालिका पुन्हा काही संसाधने उपलब्ध करून देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. यावेळी त्यांनी तेथील स्वयंसेवकांशी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढविला. यावेळी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त तथा नोडल अधिकारी मिलिंद मेश्राम उपस्थित होते. बंडू भगत, अमन रघुवंशी, रोहित हिमते, माधुरी यावलकर, मनीषा गाडगे, मृणालिनी पाठक, दिलीप ठाकरे, किरण संगावार, सुचित सिंघानिया, नितीन पटवर्धन आदी मैत्री परिवाराच्या माध्यमातून या सेवेसाठी अथक परिश्रम घेत आहेत.

ज्येष्ठ निराधारांसाठी विशेष सेवा

मैत्री परिवार अन्नदानासोबतच शहरातील निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सेवा पुरवित आहे. भोजनाची मागणी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ९११९५६७६७२ आणि निराधार ज्येष्ठांच्या मदतीसाठी ८६००५९०६२० हे दोन क्रमांक संस्थेने जाहीर केले आहे. निराधार वृद्धांना कुठलीही मदत हवी असल्यास त्यांनी संबंधित क्रमांकावर फोन केल्यास मैत्री परिवार त्यांना मदत पोहचवेल. दरम्यान मैत्री परिवाराने त्यांना आलेल्या कॉलच्या आधारावर बुटीबोरीतील एका ज्येष्ठ व्यक्तीला औषधी पोहचविली होती.

Also Read- नागपुरातील सतरंजीपुरा ठरतेय ‘करोना’चे हब

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Top 10 Email Migration Software for Gmail in 2024

Email migration can be a daunting task, especially when...

Top Best Bulk SMS Service Providers in India

Below is the list of companies currently providing top...

Top Digital Marketing Innovators to Watch in 2025

As an online business in the digital world, where...

ICSI Workshop in Nagpur : “Decoding Companies Act” for Compliance and Governance

Nagpur : Nagpur Chapter of ICSI organized a Workshop...