नागपूर ता. १६ : दररोज घरोघरून कचरा संकलीत करणारे सफाई कर्मचारी व कचरा गाड्यांच्या चालकांच्या समस्यांसंदर्भात आवश्यक उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी ए.जी. एन्व्हायरो कंपनीच्या कर्मचारी शिष्टमंडळाद्वारे महापौरांना करण्यात आली. मंगळवारी (ता.१६) शिष्टमंडळाने महापौर संदीप जोशी यांची भेट घेउन त्यांच्यापुढे आपल्या समस्या मांडल्या. यावेळी मनपाचे विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम उपस्थित होते.
ए.जी. एन्व्हायरो कंपनीद्वारे शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली व नेहरूनगर या पाच झोनमधील कचरा संकलीत करण्यात येतो. कंपनीसाठी काम करत असलेले सफाई कर्मचारी व चालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कर्मचा-यांची पगार कपात, आठवडी सुट्टी, कामाच्या तासांची निश्चिती अशा समस्यांमुळे कर्मचारी त्रस्त आहेत. याबाबत आवश्यक उपाययोजना करून कर्मचा-यांना दिलासा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
शिष्टमंडळात कर्मचारी नेते मुकेश शाहु, रितेश तांगडे, गौरव मेश्राम, सुरेश खोब्रागडे, सतीश हटवार आदींचा समावेश होता.
सफाई कर्मचारी व कचरा गाड्यांच्या चालकांच्या समस्यांसंदर्भात मनपा अतिरिक्त आयुक्त, आरोग्य उपायुक्त यांनी कर्मचारी नेत्यांसह बुधवारी (ता.१७) बैठक घेउन योग्य तो निर्णायक अहवाल सादर करावा, असे निर्देश यावेळी महापौर संदीप जोशी यांनी प्रशासनाला दिले.