नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद हैद्राबाद या संस्थेमार्फत २६ सप्टेंबर ते २ सप्टेंबर या कालावधीत ‘नई तालीम’ या कार्यक्रमांतर्गत कार्यानुभव विषयावर आधारीत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याअंतर्गत सोमवारी (ता. १) मनपा शाळांतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वसंत फाऊंडेशनच्या वतीने राजे रघुजी भोसले नगर भवन येथे दुग्ध व्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मार्गदर्शक आणि प्रशिक्षक म्हणून दुग्ध व्यवसाय तज्ज्ञ मोहन श्रीगिरीवार, वसंत फाऊंडेशनचे डॉ. अशोक बवाडे, प्रदीप भोयर, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, शिक्षण विभागाच्या समन्वयक संध्या पवार, सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चापलेकर उपस्थित होते.
प्रास्ताविकातून शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी प्रशिक्षणामागील भूमिका विषद केली. आजच्या काळात दुध आणि दुग्धजन्य पदार्थांची मोठी बाजारपेठ उपलब्ध असून यात तरुणांना दुग्ध व्यवसाय करण्यास खूप वाव आहे. भविष्यातील या दुग्ध व्यवसायातील संधी लक्षात घेऊन विद्यार्थी व पालकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. नई तालीम या कार्यक्रमांतर्गत मनपाच्या निवडक शाळांमध्ये वृक्षसंवर्धन, लेखाविषयक, पाककला, सायकल, कुकर-मिक्सर दुरुस्ती, प्रथमोचार आदी विषयांवर आधारीत उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दुग्ध व्यवसाय तज्ज्ञ मोहन श्रीगिरीवार यांनी दुध व्यवसायाबद्दल माहिती देताना या व्यवसायातून व्यवसाय करणारा करोडपती कसा बनू शकतो, याबाबत माहिती दिली. दुध कसे वापरावे, त्याचे उपयोग काय, एक गाय कशी उपयोगी आहे, दूध, शेण, गोमुत्र यातून मनुष्य कसा व्यवसाय करू शकतो, दुधातील भेसळ म्हणजे काय असते, त्याचे अपाय काय, याबाबत सविस्तर माहिती दिली. अन्य वक्त्यांनीही यावेळी पौष्टिक दुधाच्या चाचण्या काय, काय असतात, दुधाची तपासणी कशी केली जाते, याबाबत माहिती दिली.
यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी उत्तरे देत शंकांचे निरसन केले. प्रशिक्षण शिबिराला मनपाच्या निवडक शाळांतील दहावीचे विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शिक्षण विभागाच्या समन्वयक संध्या पवार यांनी केले. आभार सहायक शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कुसुम चापलेकर यांनी मानले.
अधिक वाचा : धोबी समाजच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याची मागणी



