नागपूर : नवीन वर्षाचे काउंटडाउन सुरू झाले आहे. थर्टी फर्स्टदरम्यान कोणतीही अनुचित घटना व अपघात घडू नये, यासाठी वाहतूक शाखा पोलिसांनी बंदोबस्ताची चोख आखणी केली आहे. थर्टी फर्स्टदरम्यान मद्यपी मोटरसायकलस्वार वाहतूक पोलिसांच्या रडारवर असतील, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त राजतिलक रोशन यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली. ते म्हणाले, ‘२३ डिसेंबरपासूनच वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. चार दिवसांत १२ हजार वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
३१ डिसेंबरला दुपारी ४ वाजतापासून वाहतूक पोलिस रस्त्यावर तैनात करण्यात येतील. मद्यपी वाहनचालकांसह जोरजोराने हॉन वाजिविणारे व सुसाट मोटरसायकल चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. स्थानिक पोलिस स्टेशनमधील पोलिस कर्मचाऱ्यांसह या दिवशी वाहतूक शाखेचे ६७१ कर्मचारी ठिकठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. उपराजधानीत शंभर ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉइन्ट राहतील.
सीताबर्डी, सक्करदरा, पाचपावली, मेहंदीबाग, जरीपटका व मंगळवारी येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येतील. फुटाळा तलाव व वेस्ट हायकोर्ट रोडवर सर्वाधिक पोलिस बंदोबस्त राहील, असेही रोशन यांनी सांगितले.
अधिक वाचा : टेकडी गणपतीला मिळणार डिफेंसची जागा!