नागपूर: करोना विषाणूची साखळी नागपुरभोवती दिवसेंदिवस करकचून आवळली जात आहे. एकाच दिवशी काल दहा रुग्णांना प्रादुर्भाव झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये यात आणखी आठ जणांची भर पडली. त्यामुळे या विषाणूने शहरात शिरकाव केल्यापासून आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या ८० पर्यंत पोहोचली आहे.
चिंतेची बाब म्हणजे शहरात सोमवारी नव्याने पॉझिटिव्ह आढळलेल्या आठ जणांपैकी बहुतांश जण हे सतरंजीपुरा येथील करोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासात आलेल्यांपैकी आहेत. करोना प्रादुर्भावाची साखळी खंडीत होण्याऐवजी ती दिवसागणिक वाढत असल्याने सतरंजीपुराचा परिसर या आजाराचे केंद्रबिंदू ठरत आहे. त्यामुळे संपूर्ण सतरंजीपुरा, मोमिनपुरा आणि शांतीनगरात भीती- दहशत आणि चिंता असे विचित्र वातावरण आहे.
सोमवारी पॉझिटिव्ह आढळलेल्यांच्या घशातील स्त्रावाची शहरातील मेडिकल, मेयो आणि एम्स अशा तिन्ही ठिकाणी चाचणी करण्यात आली. त्यात एम्समध्ये एक, मेयोत एक तर मेडिकलच्या विषाणू प्रयोगशाळेत चार नमुन्यांमध्ये करोनाचा अंश सापडला. यात मेडिकलमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये ४० वर्षीय पुरुष आणि अनुक्रमे ११ वर्षीय मुलगी आणि ३५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर मेयोत तपासलेल्या नमुन्यांपैकी १३ वर्षीय मुलाच्या घशातील स्त्राव नमुन्यात करोना विषाणूचा अंश सापडला. सतरंजीपुरा येथील रुग्णाचा नातेवाईक असलेला हा मुलगा लोणारा येथील विलगीकरण कक्षात दाखल होता.