नागपूर : चंद्रपूर गोंदिया रेल्वेमार्गावर आज (ता. 15) सकाळी वाघाचे सहा महिने वयाचे दोन बछडे रेल्वेखाली येऊन मृत्युमुखी पडले. अवनीचा विषय ताजा असतानाच ही मोठी घटना घडल्याने वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे.
चंद्रपूरजवळील वनविकास महामंडळच्या लोहारा जंगलातून गोंदियाकडे जाणारा रेल्वेमार्ग आहे. अतिशय घनदाट असे हे जंगल असून, वन्यजीव इथे विपुल प्रमाणात आहेत. वाघिणीपासून लांबवर खेळत असलेले हे बछडे रुळावर आले आणि त्याचवेळी आलेल्या भरधाव रेल्वेगाडीनं त्यांना उडवले. ही घटना रात्री घडली की सकाळी, याची माहिती वनविभागाकडे नाही. हे दोन्ही बछडे मादी असून, सहा महिने ते एक वर्षादरम्यान त्यांचं वय आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
चंद्रपूर ते मूलदरम्यानचा संपूर्ण मार्गच घनदाट जंगलातून गेला असल्याने यापूर्वीही वन्यजीवांचा बळी गेला आहे. त्यामुळे रेल्वे विभागाला इथून गाड्यांची गती कमी ठेवून भोंगा वाजवत जाण्यास सांगितले गेले आहे. मात्र, या सूचना पाळल्या जात नाहीत, असे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणं आहे.
ही घटना एक अपघात असला तरी अवनी प्रकरणामुळे वादात सापडलेल्या वनविभागाला मोठा धक्का देणारी आहे.
अधिक वाचा : अवनीसाठी नागपुरात होणार आंदोलन