नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून तरुणींना देहव्यापारात ढकलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात यशोधरानगर पोलिसांना यश आले आहे. यावेळी तपासात राजस्थानमध्ये उपराजधानीतील तीन तरुणींची विक्री करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून पोलिसांनी दोघांना अटक केली.
नूरजहा शेख कलीम (३३) रा. गुलशननगर, कळमना आणि रतनबाई बिरमचंद मीना (३३) रा. झालावाड, राजस्थान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित तरुणी २० ते २४ वष्रे वयोगटातील असून कळमना, इमामवाडा आणि नंदनवन परिसरात राहणाऱ्या आहेत. काही महिन्यांपूर्वी कळमना परिसरात राहणाऱ्या युवतीची आरोपी नूरजहा शेख हिच्याशी ओळख झाली होती. तिने राजस्थानमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी आणखी दोन युवतींना शोधण्यास सांगितले. तिघींनाही नोकरी मिळणार असे आमिष दाखवून तरुणींना राजस्थानला जाण्यासाठी तयार केले. नूरजहा हिने दलाल राजू ऊर्फ आत्माराम पन्नालाल रॉय (३४) रा. वनदेवी चौक, यशोधरानगर आणि हसन कुरेशी शेख (४०) यांच्या मदतीने राजस्थानमधील दलाल विरम मीना याला तीन मुलींची माहिती दिली. त्याने लगेच युवतींच्या मोबाईलवरून फोटो पाठवण्यास सांगितले.
फोटो मिळताच राजस्थानमध्ये देहव्यापाराची मुख्य दलाल रतनबाई बिरमचंद मीना हिने पैशाची व्यवस्था केली. गेल्या २३ ऑक्टोबरला आरोपी मुलींना घेऊन राजस्थानात गेले. तेव्हापासून ४ नोव्हेंबपर्यंत रतनबाई हिच्या अड्डय़ावर त्यांना ठेवण्यात आले. दरम्यान, तरुणींना आपली विक्री झाल्याची कल्पना आली. त्यांनी धडपड केली. मात्र, ती व्यर्थ ठरली. दुसरीकडे राजू रॉय आणि हसन शेख या गांजा तस्करांना भोपाळ रेल्वेस्थानकावर अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून गांजा जप्त करून इतर गुन्ह्य़ांची चौकशी केली असता त्यांनी तीन तरुणींची राजस्थानमध्ये विक्री केल्याची माहिती दिली. त्यानंतर मध्यप्रदेश पोलिसांनी यशोधरानगर पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. यशोधरानगर पोलिसांनी राजस्थान गाठून तीन तरुणींची सुटका करीत दोघींना अटक केली.
अधिक वाचा : मॉर्निग वॉकला गेलेल्या 3 शिक्षकांना बोलेरा गाडीने उडवले; दोघांचा जागेवरच मृत्यू