नागपूर : गेल्या आठ दिवसांत नागपुरात तब्बल ६० रुग्णांची नोंद झाली. यात आज दीड वर्षाच्या मुुलासह तीन नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १२७ झाली आहे. यातील एक महिला रुग्णाला १४ दिवस झाल्याने व तिचे नमुने निगेटिव्ह आल्याने मेडिकलमधून सुटी देण्यात आली. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता २३ झाली आहे.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) आज तपासलेल्या नागपुरातील ३१ नमुन्यात मोमीनपुरा येथील ५५ व ३७वर्षीय महिलेला कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. मेडिकलच्या प्रयोगशाळेत सतरंजीपुरा येथील रहिवासी असलेल्या दीड वर्षाचे मुलाचे नमुने पॉझिटिव्ह आले. नागपुरात मार्च महिन्यात केवळ १६ रुग्णांची नोंद असताना एप्रिल महिन्यात १११ रुग्णांचे निदान झाले आहे. वाढत्या रुग्ण संख्येला घेऊन लोकांमध्ये भितीचेही वातावरण वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने घरीच राहण्याचे व महत्त्वाचे काम असेल तरच मास्क बांधून घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.
आई-वडिलासह आता मुलगाही पॉझिटिव्ह
शनिवारी नागपुरात १९ रुग्णांची नोंद झाली. यात या दीड वर्ष मुलाचे आई-वडिलही होते. मुलाचा अहवाल प्रलंबित होता. यामुळे त्याला नातेवाईकांसोबत ठेवण्यात आले होते. मात्र रविवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे मुलाला मेडिकलच्या वॉर्डमध्ये दाखल असलेल्या आईसोबत ठेवण्यात आले आहे.
४६ वर्षीय महिला कोरोनामुक्त
सतरंजीपुरा येथील रहिवासी असलेली ४६ वर्षीय महिला रविवारी कोरोनामुक्त होऊन मेडिकलमधून घरी गेली. क्वारंटाइन असलेल्या या महिलेचे नमुने १२ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आले. त्याच दिवशी तिला मेडिकलमध्ये दाखल केले. १४ दिवस पूर्ण झाल्याने २४ तासांच्या अंतराने दोन नमुने तपासण्यात आले असता अहवाल निगेटिव्ह आला. यामुळे मेडिकलने सायंकाळी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. पुढील १४ दिवस महिलेला होम क्वारंटाइन रहावे लागणार आहे. मेयोमधून आतापर्यंत सहा तर मेडिकलमधून १७ असे एकूण २३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
मेयो, मेडिकल व एम्समधील १५४ नमुने निगेटिव्ह
एम्सने सायंकाळी ६ वाजेपर्यंत ८३ नमुने तपासले. यात यवतमाळ जिल्यातील ५२ नमुन्यामधून १४ नमुने पॉझिटिव्ह तर १८ नमुने निगेटिव्ह आले. उर्वरीत २० नमुने योग्य पद्धतीने घेतलेले नव्हते. ते पुन्हा घेण्यास सांगण्यात आले. मेयोच्या प्रयोगशाळेने ५० नमुने तपासले. हे सर्वच नमुने निगेटिव्ह आले. मेडिकलच्या प्रयोगाळेत ८७ नमुने तपासले. यातील एक पॉझिटिव्ह तर उर्वरी ८६ नमुने निगेटिव्ह आले. एकूणच मेयो, मेडिकल व एम्समधील १५४ नमुने निगेटिव्ह आले. माफसू व निरीच्या प्रयोगशाळेतून तपासलेल्या नमुन्यांची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही..
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित ७७
दैनिक तपासणी नमुने २२०
दैनिक निगेटिव्ह नमुने १५४
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने १२७
नागपुरातील मृत्यू ०१
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण २३
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १२९७
क्वॉरन्टाईन कक्षात एकूण संशयित ६६४
-पीडित १२७
दुरुस्त २३
मृृत्यू १
Also Read- Mumbai Accounts for 358 of 440 New Coronavirus Cases in Maharashtra as State Tally Crosses 8,000