नागपूर : मध्य प्रदेशातील सागर येथून मजुरीसाठी नागपुरात आलेल्या १९ वर्षीय तरुणीवर खासगी बसमध्ये (ट्रॅव्हल्स) सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. तरुणीने वेळीच स्वत:ची सुटका करून घेतल्याने अनर्थ टळला. ही खळबळजनक घटना सीताबर्डीतील एमपी बसस्थानक भागात शनिवारी पहाटे घडली. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून चालक, वाहकासह तिघांना अटक केली.
चालक मुकेश जगदीशप्रसाद सिंगरवारे (वय २९, रा. मंडला), वाहक अरविंद गणेशप्रसाद पांडे (वय ४१, रा. सागर) व हेल्पर भय्यालाल अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबरला पीडित तरुणी ट्रॅव्हल्सने नागपुरात आली. प्रवासादरम्यान मुकेश व अरविंदची तिच्यावर नजर होती. पहाटे ५ वाजताच्या सुमारास ती सीताबर्डीतील एमपी बस स्थानकावर उतरली. दोघे तिच्यावजळ आले. तिच्याकडील बॅग हिसकावली व दोघे परत ट्रॅव्हल्समध्ये गेले. तरुणी बॅग घेण्यासाठी ट्रॅव्हल्समध्ये गेली असता दोघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न केला. तरुणीने आरडाओरड केली. स्वत:ची सुटका करण्याचा प्रयत्न केला. ‘माझा भाऊ मला घ्यायला आला आहे, तो बाहेर उभा आहे’, असे तिने दोघांना सांगितले. त्यामुळे दोघे घाबरले व तिला सोडले.
ट्रॅव्हल्समधून खाली उतरताच तिने पोलिस नियंत्रण कक्षाला कळविले. पोलिस नियंत्रण कक्षाने सीताबर्डी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच सीताबर्डी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर दानडे यांच्यासह सीताबर्डी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तिघांना अटक केली. भय्यालाल याला या घटनेची माहिती होती. मात्र, त्याने पोलिसांना माहिती दिली नाही किंवा दोघांना हटकले नाही. त्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली.
अधिक वाचा : बनावट पोलीस बनून वृद्धांना लुटणारी टोळी नागपूरात सक्रिय