नागपूर: मुळचे जबलपुरचे असलेले व सद्या नागपुरातील मोमीनपुरा परिसरात राहणारे तिघे मंगळवारी (ता.२८) कोविड-१९ ला हरवून पूर्णपणे बरे झाले आहेत. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) कोरोना कक्षातून तिघांनाही ‘डिस्चार्ज’ मिळाल्यानंतर सर्व डॉक्टर, नर्स, परिचारीकांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले.
दिल्लीवरून परतलेल्या नागरिकांचा शोध घेउन मनपातर्फे त्यांना ‘कॉरंटाईन’ करण्यात आले. यामध्येच ३४ वर्षीय व्यक्ती] २४ वर्षीय आणि १७ वर्षीय तरुणांचा समावेश होता. या तिघांनाही आमदार निवास येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. १३ एप्रिलला या तिघांचेही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले. १४ दिवसांच्या ‘हॉस्पिटल कॉरंटाईन’ दरम्यान वेळोवेळी त्यांचे ’स्वॅब’ घेण्यात आले. २६ व २७ एप्रिलला तिघांचेही ‘स्वॅब’ निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना मंगळवारी (ता.२८) घरी पाठविण्यात आले. यावेळी उपस्थित वैद्यकीय उपअधीक्षक डॉ.सागर पांडे यांच्यासह उपस्थित परिचारिका व रुग्णालय कर्मचा-यांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.
रुग्णालयातून रुग्णांना सुट्टी देण्यात आली असली तरी त्यांना १४ दिवस ‘होम क्वॉरंटाईन’ राहणे बंधनकारक आहे. इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये डॉक्टरांकडून वेळावेळी आवश्यक उपचार करण्यात आले. प्रशासनातर्फे वेळेवर उपचार मिळाल्याने आज आम्ही पूर्णपणे बरे झाले आहोत. कोरोनाला प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाकडून दिल्या जाणा-या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. कोणतेही लक्षण आढळल्यास माहिती न लपवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन या तिन्ही रुग्णांमार्फत करण्यात आले आहे.