नागपूर : बनावट ओळखपत्राद्वारे रेल्वेची ई-तिकिटे काढून ती चढ्या भावाने विकणाऱ्याला सोमवारी अटक करण्यात आली. हितेश गुप्ता (वय ३६, रा. त्रिमूर्तीनगर) असे आरोपीचे नाव आहे. ही कारवाई आरपीएफने केली. यावेळी तिकिटांसह ३ लाख ४३ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
प्रतापनगर भागातील गुप्ता ट्रॅव्हल्सच्या कार्यालयातून ई-तिकिटांचा काळा बाजार होत असल्याची गुप्त माहिती आरपीएफला मिळाली होती. त्यामुळे आरपीएफने प्रतापनगर पोलिसांना कळवून गुप्ता ट्रॅव्हल्सवर धाड घातली. त्यावेळी तेथे हितेश गुप्ता हजर होता. त्याला तिकिटांच्या काळ्या बाजाराविषयी विचारले असता त्याने काही माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे तेथील कम्प्युटरची तपासणी केली असता वेगवेगळ्या १२ बनावट नावांद्वारे ई तिकिटे काढण्यात येत असल्याचे आढळून आले. अधिक चौकशीत आरोपीने बनावट नावांवर अशी तिकिटे काढत असल्याचे मान्य केले. गुप्ताकडे आयआरसीटीसीचा अधिकृत परवाना आहे. मात्र, त्या परवान्याशिवाय बनावट नाव तयार करून त्याद्वारेही तिकिटे काढायची व ती प्रवाशांना अधिक दराने विकायची, असा धंदा सुरू होता.
या कारवाईच्यावेळी आठ करंट तिकिटे तसेच ११० जुनी तिकिटे जप्त करण्यात आली. तसेच कम्प्युटर, प्रिंटर असा एकूण ३ लाख ४३ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध रेल्वे कायदा कलम १४३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतिजा यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांच्या नेतृत्वात, गुन्हेशाखा निरीक्षक एस. के. मिश्रा, उपनिरीक्षक शिवराम सिंह, उपनिरीक्षक होतीलाल मीना, प्रधान आरक्षक विजय पाटील, दीपक वानखेडे, आरक्षक अश्विन पवार, अमित बारपात्रे, आनंद गायकवाड यांनी केली.
अधिक वाचा : नागपूर न्यायालय परिसरात वकिलावर कुऱ्हाडीने हल्ला; हल्लेखोराची आत्महत्या