नागपूर : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या तरुणाने आपल्या प्रेयसीची चारित्र्याच्या संशयावरून हत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोतीलालनगर परिसरात घडली. संगीता सोनकुसरे असे या मृतक तरुणीचे तर रवींद्र गुलाबराव लांडगे असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे.
हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. रवींद्रला संगीताच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे त्याने तिची गळा चिरून हत्या केली आणि मृतदेह एका रिकाम्या प्लॉटमध्ये फेकून दिला. या परिसरातील रहिवासीयांना हा मृतदेह दिसून आल्याने त्यांनी नंदनवन पोलिसांना कळविले. सुरुवातीला संगीताची ओळख पटलेली नव्हती. परंतु आसपासच्या नागरिकांनी तिचा चेहरा ओळखला. या तरुणीचे नाव माहिती नसले तरीसुद्धा ही तरुणी याच परिसरातील रहिवासी असून दोन तरुणांसोबत फिरताना दिसून येत होती, अशी माहिती गुन्हे शाखेला प्राप्त झाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी तिच्या प्रियकराचे घर शोधून काढले आणि त्याला ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखविताच रवींद्र पोपटासारखा बोलू लागला. संगीताचे वडील शिक्षक आहेत. ती रवींद्रसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. रवींद्र मजुरीची कामे करतो. पोलिसांनी रवींद्रला अटक केली आहे.
अधिक वाचा : स्पर्धा परीक्षेच्या तणावातून २४ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या