नाणारमधील वेस्ट कोस्ट रिफायनरी प्रकल्प स्थानिकांवर लादणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपुर :- नाणार प्रकल्पाशी संबंधित सगळ्यांशी आमची चर्चा करण्याची तयारी आहे. नाणारमधील वेस्ट कोस्ट रिफायनरी प्रकल्प हा स्थानिकांवर लादणार नाही. विरोध डावलून या प्रकल्पाची निर्मिती करण्यात येणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळास संबोधित करताना स्पष्ट केले आहे. या विरोधकांशीही चर्चा करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले, की नाणारमधील वेस्ट कोस्ट रिफायनरी प्रकल्पावरुन सभागृहात सातत्याने चर्चा, गोंधळ आणि सभात्यागदेखील झाला आहे. पण स्थानिकांचा विरोध डावलत या प्रकल्पाची निर्मिती करण्यात येणार नाही. जमिनीचे बळजबरी अधिग्रहण करण्यात येणार नाही, अशी ग्वाही आज त्यांनी दिली.
मुख्यमंत्री म्हणाले, की भारताच्या ऑईल सेक्युरिटी करता वेस्ट कोस्टवर एक रिफायनरी तयार करावी असे ठरले. विविध आखाती देशांसोबत आपले चांगले संबंध निर्माण झाले असून त्यांच्याशी आपण विविध करार केले आहेत. त्यातून देशाची ऑईल सेक्युरिटी आणि त्या माध्यमातून निर्यातदेखील करण्यात यावी या संकल्पनेमुळे वेस्ट कोस्ट रिफायनरी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सिंगापूरला अशाच प्रकारचा प्रकल्प आहे. या प्रकल्पांसाठी समुद्र किनारा आवश्यक असतो. ज्यामुळे किमती कमी राहतात, असे मुख्यमंत्री म्हणाले. केवळ याच कारणासाठी नाणारची निवड करण्यात आली, असा खुलासाही त्यांनी केला. फडणवीस म्हणाले, की पश्चिमी किनार पट्ट्यावर ही रिफायनरी तयार करायची होती. गुजरात, आंध्रा प्रदेशनेही या प्रकल्पाची मागणी केली होती. हा प्रकल्प महाराष्ट्राला मिळावा, अशी मी मागणी केली होती. पण आंध्रातील मार्ग योग्य नसल्याने हा प्रकल्प महाराष्ट्राला मिळाला. साधारणपणे तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पासाठी करण्यात येणार आहे. मात्र या प्रकल्पाला विरोधकांनी, स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. याप्रकल्पामुळे नैसर्गिकदृष्ट्या महत्वाच्या प्रदेशावर विपरित परिणाम होणार, अशी भीती विरोधकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आंब्याच्या झाडांवर परिणाम होणार अशी भीती नागरिकांत आहे. मात्र आम्ही आयआयटी सारख्या संस्थांना प्रकल्पाच्या परिणामांचा अभ्यास करण्याचे काम दिले आहे. विरोधकांशी चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत.