नागपूर: शहरातील ५६ जण कोविड-१९ पॉझिटिव्ह ठरण्याचे कारण बनलेल्या आणि २३५ जणांच्या संसर्गासाठी धोका ठरलेल्या सतरंजीपुरा येथील ‘त्या’ मृत कोरोनाग्रस्ताचे मुलगा आणि मुलगी आज (ता.२४) कोरोनामुक्त होउन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (मेडीकल) घरी परतले.
शहरात कोविड-१९ रुग्ण संख्येने शतक गाठल्याने एकीकडे चिंता वाढली असतानाच कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या ‘त्या’ रुग्णाच्या संसर्गाने बाधित दोघे पूर्णपणे बरे झाल्याने कोरोना विरोधात लढा देणा-या प्रत्येकाचे मनोबलही उंचावले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (मेडीकल) प्रशासनाने टाळ्या वाजवून या दोन्ही रुग्णांना निरोप दिला.
५ एप्रिलला मृत्यू झालेल्या सतरंजीपुरा बडी मस्जीद परिसरातील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. या रुग्णामुळे शहरातील २३५ जणांना कोविड-१९च्या संसर्गाचा धोका निर्माण झाला तर ५६ कोरोनाबाधित ठरले. ‘त्या’ रुग्णाच्या परिवारातील सर्व सदस्यांना मनपाच्या ‘कोविड कंट्रोल सेंटर’मध्ये नेण्यात आले. ७ एप्रिलला ‘त्या’ रुग्णाची ३५ वर्षीय मुलगी व ३० वर्षीय मुलाचे ‘स्वॅब’ पॉझिटिव्ह आले. तेव्हापासून दोघांवरही मेडीकलमध्ये उपचार सुरू झाले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश गावंडे यांच्या मार्गदर्शनात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार सुरू झाले. १४ दिवसांच्या ‘हॉस्पिटल कॉरंटाईन’ दरम्यान वेळोवेळी त्यांचे ’स्वॅब’ घेण्यात आले. चौदाव्या दिवशी २१ एप्रिलला आणि पंधराव्या दिवशी २२ एप्रिलला देण्यात आलेले दोघांचेही दोन्ही ‘स्वॅब’ निगेटिव्ह आले. त्यानंतर इतर आवश्यक सर्व तपासण्या करून शुक्रवारी (ता.२४) दोघांनाही सुट्टी देण्यात आली व सुखरूप घरी पाठविण्यात आले. रुग्णालयातून रुग्णांना सुट्टी देण्यात आली असली तरी त्यांना १४ दिवस ‘होम क्वॉरंटाईन’ राहणे बंधनकारक आहे.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश गावंडे यांच्यासह डॉ.कांचन वानखेडे, डॉ. फैजल, डॉ. स्नेहल, डॉ. मुरारी सिंग, डॉ.श्याम राठोड, डॉ. चेतन वंजारी, डॉ.विपुल मोदीख डॉ. पटनाईक, मालती डोंगरे, फार्मासिस्ट श्री.चक्रबर्ती यासर्वांसह उपस्थित परिचारिका व रुग्णालय कर्मचा-यांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.
Also Read- बेघर निवारा केंद्रातील रहिवाश्यांना मनपातर्फे मास्क तयार करण्याचे प्रशिक्षण!