नागपूर: नागपूर महानगरपालिकेमध्ये काम करताना सर्वांनाच अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. आव्हाने ही आपणाला कार्य पणाला नेण्याची प्रेरणा देतात. आव्हानांविना कोणतेही कार्य निरस असते. रोजच्या आपल्या कामामध्ये काही बदल वाटावा, काम करताना ऊर्जा निर्माण व्हावी व नव्या चैतन्याने काम करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी वनामतीच्या सहकार्याने मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर कर्तव्यावर रूजू होताना आपल्या कामामध्ये प्रशिक्षणात सांगितल्या बाबी प्रतिबिंबित झाल्यास प्रशिक्षणाचा उद्देश सफल होईल, असे प्रतिपादन मनपा आयुक्त व वनामतीचे संचालक रवींद्र ठाकरे यांनी केले.
वनामती येथे आयोजित मनपाच्या तांत्रिक (टेक्निकल) व अतांत्रिक (नॉन टेक्निकल) कर्मचाऱ्यांच्या पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा शनिवारी (ता. १३) समारोप झाला. समारोपीय कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मनपा आयुक्त व वनामतीचे संचालक रवींद्र ठाकरे बोलत होते. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, वनामतीचे कुलसचिव मुकुंद देशपांडे, वनामतीचे प्रशिक्षण समन्वयक विश्वास पांडे प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय वनामती येथे शनिवार (ता. १३)पासून सहायक आयुक्त व विभाग प्रमुख यांच्यासाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.
समारोपीय कार्यक्रमात बोलताना आयुक्त व वनामतीचे संचालक रवींद्र ठाकरे म्हणाले, प्रशिक्षणानंतर नव्या उमेदिने सर्वांनी कामाला लागून आपल्या समाजासाठीचे जे चांगले करता येईल, ते करण्याचा पूरेपूर प्रयत्न करावा. कार्यालयात काम करत असताना कर्मचारी नेहमी तणावात असतात. एक ‘रोबोट’ सारखेच प्रत्येक जण कामात गुंतले असतात. अशात आपणाला एक व्यक्ती म्हणून आयुष्य जगण्यासाठी ऊर्जा मिळावी, हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. त्यामध्ये यश आल्यास आपल्या प्रशिक्षण कार्यक्रमाची फलनिष्पत्ती झाली असे म्हणता येईल, असेही आयुक्त रवींद्र ठाकरे म्हणाले.
आज आपले शहर ‘स्मार्ट सिटी’ म्हणून उदयास येत आहे. कोणत्याही शहराच्या विकासात तेथील नागरिकांप्रमाणेच मनपातील मोठ्या अधिकाऱ्यांपासून सर्व कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची असते. अशात आपल्याकडे उपलब्ध तंत्रज्ञानाच्या ज्ञानात अधिक भर घालून आपणही ‘स्मार्ट वर्क’ करावे, असेही आयुक्त श्री. ठाकरे म्हणाले.
अधिक वाचा : नवरात्री महोत्सव निमित्त शहरातील नवरात्रोत्सव मंडळाला मुख्यमंत्र्यांची भेट