नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर भाष्य केलं. राजकारणामुळं राम मंदिर उभारणीचा मुद्दा लांबणीवर पडला, असं ते म्हणाले. राम मंदिर उभारणीसाठी मोदी सरकारनं कायदा करायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला.
मोहन भागवत यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि नानक यांच्या शिकवणीचा उल्लेख करत, भारतीय लष्कर आणखी सक्षम करण्याची गरज असल्याचं म्हटलं. ‘एससी-एसटी’ समाजातील वंचित घटक, पीडितांना आणखी सक्षम करण्याची गरज आहे, असंही त्यांनी सांगितलं. शहरी नक्षलवादाच्या संकल्पनेवरही त्यांनी भाष्य केलं. देशभरातील छोट्या-मोठ्या आंदोलनांमध्ये भारताचे तुकडे होणार म्हणणारे लोक दिसले. सोशल मीडियावर त्याचा जोरदार प्रचार केला जात आहे. त्यासाठीचा मजकूर पाकिस्तान, इटली, अमेरिकेतून पुरवला जातो, असंही ते म्हणाले. समाजात निर्माण झालेला असंतोष दूर करायला हवा. दबलेल्या-पिचलेल्या लोकांना त्यांचे अधिकार द्यायला पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी मोदी सरकारला दिला.
महात्मा गांधी, बोस यांचे स्मरण
मोहन भागवत यांनी महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याचा उल्लेख केला. ‘देशात सांस्कृतिक जागराची परंपरा सुरुच आहे. राजकारणासंबंधी अनेक अभिनव प्रयोग करण्यात आले. ब्रिटिशांच्या काळात महात्मा गांधींनी असेच प्रयोग केले. सत्य आणि अहिंसेच्या आधारे राजकारणाची कल्पना केवळ आपल्याच देशातील लोक करू शकतात. शस्त्रांच्या आधारे लढा देणारे लोकही होते. याच नैतिक बळाच्या आधारे सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि स्वतंत्र भारताचे पहिले सरकार विदेशात स्थापन केलं. या घटनेलाही आता दीडशे वर्षे झाली आहेत’, असंही भागवत म्हणाले.
अधिक वाचा : दीक्षाभूमीवरील मनपाच्या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन