नागपूर / स्नानगृहात अडकलेल्या बिबट्याची 5 तासांनंतर सुटका, बिबट्यांचा वावर वाढल्यामुळे नागरिक भयभीत

नागपूर

नागपूर : भंडारा जिल्ह्यात स्नानगृहात अडकलेल्या बिबट्याची पाच तासांनंतर सुटका करण्यात आल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बाक्टी येथे घडली. स्नानगृहात बिबट्या अडकल्याची माहिती पसरताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी उसळली होती.

तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर गावखेड्यात वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच नवेगावबांध येथील एका घरातून बिबट्याला जेरबंद करून जंगलात सोडण्यात आले होते. या घटनेला काही दिवस होत नाही तोच मंगळवारी सकाळच्या सुमारास तालुक्यातील बाक्टी येथील श्रीराम शेंडे यांच्या घरातील स्नानगृहात बिबट्याने आश्रय घेतल्याचे लक्षात आले.सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शेंडे यांच्या स्नानगृहात बिबट्याने ठाण मांडल्याचे लक्षात येताच वन विभागाला माहिती देण्यात आली. वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने सरळ बाक्टीकडे धाव घेत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तब्बल पाच तासांच्या थरारानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आले.