नागपूर : विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर वाढविण्यासाठी तसेच शिक्षकांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण परिषद उपयोगी ठरेल असा विश्वास नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी व्यक्त केला. शुक्रवारी (ता.२४) महाराष्ट्र राज्य प्रगत शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत कविवर्य सुरेश भट सभागृह येथे महानगरपालिकेतील शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर उपायुक्त राजेश मोहिते, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, सहायक शिक्षणाधिकारी राजेंद्र सुखे, प्रिती बंडेवार, कुसुम चाफलेकर, डीसीआरचे अनिल डुमरे, ज्योती बोंदरे, धनराज राऊळकर, श्रीमती संकदवार प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री.ठाकरे म्हणाले, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महानगरपालिकेचा शिक्षण विभाग सतत झटत असतो. आपल्या शाळेतील विद्यार्थी शंभर टक्के प्रगत होण्यासाठी शिक्षकांनी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शाळेतील प्रगत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांची आवड निवड लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्यांच्या आवडीनिहाय क्षेत्रात त्यांना प्रवीण करणे गरजेचे आहे. आता अभ्यासक्रम बदललेला आहे. त्यानुसार शिक्षकांनीही आपला अध्ययन स्तर उंचावणे हे देखील महत्त्वाचे आहे. शिक्षकांचा अध्ययन स्तर सुधारण्यासाठी अशा प्रकारच्या सात कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सहायक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रिती बंडेवार यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका प्रास्ताविकाद्वारे विषद केली. या कार्यशाळेमध्ये अध्ययन निष्पती, लेखन व वाचन, संख्येचे ज्ञान, अध्ययन स्तर व सातत्यपूर्ण मूल्यपामन, कृतीयुक्त शिक्षण व ज्ञानरचना यावर भर, मुलींचे गळतीचे प्रमाण याविषयावर तज्ज्ञ मंडळींनी पीपीटीद्वारे मार्गदर्शन केले. राष्ट्रीय संपादनता पातळी (नास) या कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधी मार्गदर्शनही या कार्यशाळेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला महानगरपालिकेच्या शाळेतील सर्व शिक्षक, शाळा निरीक्षक, गुणवत्ता समन्वयक, विषय प्रमुख यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अधिक वाचा : नाग नदी शुद्धीकरण प्रकल्पाला फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरुवात – नितीन गडकरी