नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अनेक प्रतिभावंत खेळाडू आहेत. मात्र हे खेळाडू परिस्थिती व मार्गदर्शनाअभावी पुढे येउ शकत नाहीत. आपल्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे गरीब घरचे आहेत. मात्र त्यांच्यातील प्रतिभा ही देशाचे नाव लौकीक करणारी आहे. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. ॲथलेटिक्स ‘खेळाडू शोध व निवड‘ अभियानामार्फत मनपा शाळांमधील विद्यार्थीही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव लौकीक करतील, असा विश्वास मनपाचे क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी व्यक्त केला.
क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या नागपूर महानगरपालिका व नागपूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ॲथलेटिक्स ‘खेळाडू शोध व निवड‘ अभियानाचा माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (ता. १५) डिप्टी सिग्नल येथील मनपाच्या संजय नगर हिंदी माध्यमिक शाळा येथून शुभारंभ झाला.
यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा समिती सभापती नागेश सहारे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, क्रीडा अधिकारी नरेश सवाईथुल, नागपूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव डॉ. शरद सूर्यवंशी, संजय नगर हिंदी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र गावंडे, सुनील डोईफोडे, संजय कोहळे, नितीन भोळे, बंडू नगराळे, बाळासाहेब बन्सोड आदी उपस्थित होते.
यावेळी क्रीडा सभापती नागेश सहारे म्हणाले, ॲथलेटिक्स हा खेळ अत्यंत कमी खर्चाचा असून गरीब घरातील विद्यार्थीही याकडे सहजतेने वळू शकतात. त्यांना फक्त शाळांमधून मैदानात काढून त्यांच्यातील प्रतिभा पुढे आणण्याची गरज आहे. मुलांमध्ये बालवयापासूनच खेळाविषयी आवड निर्माण करून त्यांना त्याच्यातील करिअरच्या संधी पटवून दिल्यास ते याकडे आकर्षीत होतील. या संकल्पनेतून ॲथलेटिक्स ‘खेळाडू शोध व निवड‘ अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाद्वारे शहरातील महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची प्राथमिक चाचणी घेउन निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नागपूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार म्हणाल्या, कोणत्याही कार्यात आत्मविश्वास हा अत्यंत महत्वाचा आहे. आत्मविश्वासामुळे आपल्या मार्गातील अडथळे दूर करण्याची क्षमता आपल्यात निर्माण होते. या अभियानाद्वारे आपणाला पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करायचे हे ध्येय ठेवून मैदानात आत्मविश्वासाने प्रत्येक अडथळे पार करा, असा मंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
नागपूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव डॉ. शरद सूर्यवंशी यांनी अभियानाची विस्तृत माहिती यावेळी दिली. ते म्हणाले, प्रतिकुल परिस्थितीवर मात करून मैदानातील आपल्या कामगिरीच्या बळावर ॲथलेटिक्समध्ये हिमा दास पासून ते आपल्या शहरातील प्राजक्ता गोडबोलेने देशात नाव लौकीक केले आहे. आपणा सर्वांमध्येही ती क्षमता आहे ती मैदानात उतरून दाखवून द्या. शाळांमधील प्राथमिक फे-यांमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना असोसिएशनच्या वतीने वयोगटानुसार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यानंतर पुन्हा चाचणी घेउन निवड झालेले विद्यार्थी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून प्रशिक्षित करून राज्य, राष्ट्रीय स्तरावर आव्हान देण्यास तयार करण्यात येईल, असेही डॉ. सूर्यवंशी यांनी सांगतिले.
यावेळी संजय नगर हिंदी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची असोसिएशनच्या तांत्रिक अधिका-यांच्या उपस्थितीत चाचणी घेण्यात आली. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांसह मनपाच्या विविध शाळांचे क्रीडा शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विठ्ठल खोंडे यांनी केले तर आभार शाळेच्या पर्यवेक्षिका ज्योती काकडे यांनी मानले.
अधिक वाचा : प्रशिक्षणाचा उद्देश आपल्या कामातून प्रतिबिंबित व्हावा : आयुक्त रवींद्र ठाकरे