नागपूर: लॉकडाउनमध्ये नागरिकांना माफक दरात ताजा आणि उत्तम भाजीपाला, फळे मिळावे यासाठी महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून शहरात पहिले ‘कम्युनिटी मार्केट’ साकारण्यात आले आहे. आठ रस्ता चौकातील लक्ष्मीनगर मैदानात हे मार्केट गुरूवार(ता.३०)पासून नागरिकांच्या सुविधेसाठी सुरू झाले. पहिल्या दिवशी प्रमाणेच शुक्रवारी (ता.१) दुस-या दिवशीही या ‘कम्युनिटी मार्केट’ला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. बाजारामध्ये सर्व नियमांचे योग्यरित्या पालनही केले जात आहे. मात्र नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे ‘कम्युनिटी मार्केट’ आता आठवड्यातून तीन दिवस एक दिवसआड सुरू राहणार आहे.
दीनदयाल थाली आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने ही संकल्पना राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे या बाजारात सोशल आणि फिजिकल डिस्टंसिंगची पुरेपुर काळजी घेण्यात येत आहे. बाजारात प्रवेश करताना निर्जंतुकीकरणासाठी हँडवॉश मशीनची व्यवस्था, सोशल डिस्टंसिंगचे होणारे पालन व्हावे यासाठी आखलेल्या चौकोनात नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्या अशी सर्व व्यवस्था या मार्केटमध्ये करण्यात आली आहे. शिवाय नागरिकांचाही प्रतिसाद उत्तम मिळत आहे. शुक्रवारी (ता.१) सुमारे ६०० लोकांनी या ‘कम्युनिटी मार्केट’चा लाभ घेतला. सर्व नियमांचे पालन करून नागरिक बाजारात भाजी खरेदी करीत आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुविधेकरिता आता एक दिवसआड म्हणजे आठवड्यातून तीन दिवस हे ‘कम्युनिटी मार्केट’ सुरू राहिल. रविवार, मंगळवार आणि गुरूवार हे तीनच दिवस दररोज सकाळी ६ ते ८.३० यावेळेत नागरिकांच्या सुविधेसाठी बाजार सुरू राहणार आहे. बाजारात येणा-या नागरिकांनी मास्क लावणे बंधनकारक आहे.
Also Read- धक्कादायक: ३५० किलोमीटर पायपिटीनंतर मजुराने घेतला गळफास