हैदराबाद : तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाची (टीएसआरटीसी) बस आज कोंडागट्टू येथे दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ४५ भाविकांचा मृत्यू झाला. बस घाटामधील अरुंद रस्त्यावरून प्रवास करत असताना ही दुर्घटना घडली.
बसमधील सर्व भाविक श्री आंजनेय स्वामी मंदिरात दर्शनासाठी चालले होते. ज्या बसला अपघात झाला आहे ती बस जगत्याळ जिल्ह्यातील टीएसआरटीसी डेपोची आहे. या बसमधून एकूण ६२ भाविक प्रवास करत होते. यातील आतापर्यंत ४५ जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक सिंधू शर्मा यांनी दिली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, भाविकांनी भरलेली बस दरीत कोसळण्यापूर्वी चार वेळा पलटी झाली. त्यानंतर ती दरीत कोसळली. या अपघाताबद्दल तेलंगणाचे काळजीवाहू मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दुखः व्यक्त केले आहे. त्यांनी अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांनी या अपघातासाठी ब्रेक फेल झाल्याचे कारण असू शकते असा अंदाज वर्तवला आहे. घाटाजवळ असताना एका वळणावर बसचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे, चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तरीही यासंदर्भात सविस्तर तपास केला जाणार आहे.
अधिक वाचा : इंधनचे दर कमी करणं आमच्या हातात नाही : मोदी सरकार ने हात झटकले