10 वी आणि 12 वीच्या लेखी परीक्षेला बसणाऱ्या रिपीटर आणि श्रेणीसुधारसाठी पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना 100 टक्के अभ्यासक्रमावरच परीक्षा द्यावी लागणार आहे.
कोरोनाकाळात अभ्यासक्रम पूर्ण न शिकवता आल्यामुळे तसेच विद्यार्थ्यांची मानसिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने 25 टक्के अभ्यासक्रम कपातीचा निर्णय घेतला. मात्र, 10 वी आणि 12 वीच्या लेखी परीक्षेला बसणाऱ्या रिपीटर आणि श्रेणीसुधारसाठी पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना 100 टक्के अभ्यासक्रमावरच परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यांच्यासाठी अभ्यासक्रम पकातीचा निर्णय लागू होणार नाही.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एप्रिल,मे महिन्यात इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. यावेळी रिपीटर आणि श्रेणीसुधारसाठी पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यावेळी परीक्षा देता येईल. मात्र, या विद्यार्थ्यांना 25 टक्के अभ्यासक्रम कपातीचा लाभ दिला जाणार नसल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. या विद्यार्थ्यांना 100 टक्के म्हणजेच पूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षा द्यावी लागणार आहे.
कारोना माहामरीमुळे देशात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली होती. देशात तसेच राज्यात सर्व शाळा, माहविद्यालये बंद होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करता आला नाही. तसेच, तास न झाल्यामुळे शिक्षकांना पूर्ण अभ्यासक्रमही शिकवता आला नाही. हा विचार करुन राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जुलै महिन्यात इयत्ता 10 आणि 12 वीच्या अभ्यासक्रमात 25 टक्के अभ्यासक्रम कपातीचा निर्णय घेतला होता.
या तारखेला परीक्षा होणार:
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 29 मे 2021 या कालावधीत घेण्यात येईल. 12 वी परीक्षेचा निकाल अंदाजे जुलै 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेची लेखी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्यात येईल आणि 10 वी परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे.
दरम्यान, हीच सवलत रिपीटर आणि श्रेणीवाढीसाठी पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षित होते. मात्र, या विद्यार्थ्यांना हा फायदा मिळणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनाही ही सवलत मिळावी अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून होत आहे.