नागपूर : टेकडी गणेश मंदिराच्या विस्तार आणि नुतनीकरणासाठी जागेच्या संदर्भात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली येथे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून चर्चा केली. नागपूरचे आद्य देवत असलेल्या टेकडी गणेश मंदिराची जागा संरक्षण विभागाची आहे. मंदिराचे बांधकाम जीर्ण झाले आहे. ते पाडण्यातसुद्धा आले आहे. मात्र जागा संरक्षण विभागाची असल्याने मंदिराच्या उभारणीत अनेक अडचणी आहेत.
याशिवाय वाहतुकीला अडथळा होत असलेला टेकडी गणेश मंदिरासमोरील उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे. त्याऐवजी खाली प्रशस्त रस्ता तयार केला जाणार आहे. याकरिता सुमारे पावणे दोनशे कोटींचा निधी मंजूर झाला आहे. याकरिता संरक्षण विभागाची मंजुरी लागणार आहे. यावर बांधकाम व इतर कामे करायची असल्यास ही जागा महापालिकेला हस्तांतरित करावी लागणार आहे. यासाठी नितीन गडकरी यांनी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेत संरक्षण विभागाची बैठक घेतली. यात झिरो माईलच्याही विकासावर चर्चा झाली. नागपूरसह महाराष्ट्रातील पुणे विमानतळ, अहमदनगर बायपास हे विषयसुद्धा चर्चेला घेण्यात आले. गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीशबापट, ऊर्जा तसेच नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
अधिक वाचा : महाराष्ट्र ठरले महापौर चषकाचे मानकरी