नागपूर : वस्तीत राहणाऱ्या प्रेयसीसोबत केलेली चॅटिंग मुलाच्या मोठ्या भावाला दिसली. त्याने झापल्यामुळे बदनामीच्या भीतीपोटी राणी हुसैन (१६, रा. कळमना) हिने आत्महत्या केली. व्हॉट्सॲपमुळे अल्पवयीन प्रेमाचा करुण अंत झाला.
राणी ही अकराव्या वर्गाची विद्यार्थिनी होती. तिची वर्गात शिकणाऱ्या मुलासोबत मैत्री होती. तो वस्तीतच राहत असल्याने त्यांच्या गाठीभेटी होत होत्या. राणीचे आई-वडील मजुरी करतात. राणीने त्यांना हट्ट करून स्क्रीन टच मोबाईल घेऊन मागितला होता. दुसरीकडे मुलानेही भावाकडे हट्ट करून मोबाईल घेऊन मागितला. दिवसेंदिवस दोघांचे अल्पवयीन प्रेम फुलत होते. दोघांच्या व्हॉट्सॲपवरील चॅटिंग वाढली. रात्री सर्व जण झोपल्यावर दोघांचे मेसेज आणि फोनवर बोलणे व्हायचे. अशातच मुलाच्या भावाला त्याच्या वागण्यावर संशय आला. त्याने हटकले असता भलतेच कारण सांगून वेळ मारून नेली.
मंगळवारी सकाळी मुलगा आंघोळीला गेला असताना मोठ्या भावाने मोबाईल चेक केला. त्यामध्ये वस्तीत राहणाऱ्या राणीचा नंबर दिसला. त्याने चॅटिंग बघितली असता प्रेमप्रकरण उघडकीस आले.
वयाच्या १६ व्या वर्षी प्रेमात पडलेल्या भावाची कशीबशी त्याने समजूत घातली. त्यानंतर राणीचीही समजूत घालण्यासाठी तो तिच्या घरी गेला. तिच्या आई-वडिलाला चॅटिंगबाबत सांगितले. वडिलाने रागाच्या भरात मुलीला दोन कानशिलात लगावल्या. त्यामुळे ती रडत-रडत घरात गेली. दुपारी साडेतीन वाजता घरात कुणीही नसताना तिने ओढणीने गळफास घेतला. दुपारी साडेतीन वाजता आई घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कळमना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
अधिक वाचा : प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने प्रियकराचा पाचजणांवर चाकूहल्ला