मुंबई: करोनाविरुद्ध देशाने युद्धच पुकारले असून या लढाईत सरकारची मदत करण्यासाठी अनेक उद्योगपती सरसावले आहेत. टाटा ट्रस्टने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या जात आहेत त्याला हातभार लावण्यासाठी ५०० कोटींचा निधी जाहीर केला आहे.
टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांनी या मदतीची घोषणा केली आहे. करोनाचं संकट मोठं आहे. या संकटात तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असून त्यासाठीच आम्ही ही मदत देत आहोत, असे टाटांकडून स्पष्ट करण्यात आले. टाटांच्याआधी मेदांता ग्रुपचे अनिल अग्रवाल यांनीही १०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा यांनीही आपले एक महिन्याचे वेतन देण्याची घोषणा केली आहे.
ताज हॉटेलकडून भोजनाची व्यवस्था
टाटा समूह अनेक मार्गांनी मदतीचा हात पुढे करत आहे. करोनाच्या संकटात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय असे सगळेच जण अहोरात्र सेवा देत आहेत. याशिवाय रुग्णालयांमध्ये असलेल्या रुग्णांचीही मोठी कोंडी झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन टाटा समूहाच्या ताज हॉटेलने अशी सेवा देणाऱ्या सर्वांनाच तसेच गरजू रुग्णांसाठी भोजनाची व्यवस्था केली आहे. याबाबत मुंबई महापालिकेकडूनही दुजोरा देण्यात आला आहे. मुंबई पालिका आणि ताज कॅटरर्स यांच्या अंतर्गत समन्वयातून भोजनव्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई पालिकेच्या रुग्णालयांत दाखल असलेले रुग्ण तसेच सर्व स्टाफच्या भोजनाची व्यवस्था ताज हॉटेलने केली आहे, असे ट्विट मुंबई पालिकेने केले आहे.